बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
एक प्रकल्प पूर्ण चालू झाला की बाबा लगेच दुसऱ्या प्रकल्पाची तयारी करीत. १९७३ साली त्यांनी हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी प्रकल्प’ सुरू केला. आनंदवनापासून हेमलकसा २५० किलोमीटर अंतरावर होते. हेमलकसाचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला होता, पण हे सौंदर्य रौद्र होते. त्याकाळी रस्ते नव्हतेच. वाटेत नदी व ओढे लागायचे. ते पावसाळ्यात दुथडी भरून वाहायचे, त्यामुळे हेमलकसाला जायला एक दिवस लागायचा. वाटेत मुक्काम करायला लागला तर नागेपल्लीची जागा बाबांनी सरकारकडून मागून घेतली होती. हेमलकसाची जागा मूळची वन खात्याची होती. त्यांनी ती महसूल खात्याला दिली. महसूल खात्याने ती जागा बाबांना, म्हणजे महारोगी सेवा समितीला दिली. जागा मिळाल्यावर लगेच म्हणजे २३ डिसेंबर १९७३ रोजी बाबा काही कार्यकर्त्यांसह हेमलकसाला गेले. तिथे जाऊन झाडे तोडणे, जमीन साफ करणे अशी कामे सुरू केली. यावेळी डॉ. प्रकाश नागपूरला शिकत होते. पण त्यांना त्यात म्हणजे सर्जरी करण्यात अजिबात रस नव्हता. त्यांना हेमलकसा इथे येऊन काम करायचे होते. शेवटी १९७४ च्या मार्च महिन्यात डॉ. प्रकाश हेमलकसा येथे येऊन पोहोचले. तोपर्यंत बाबांनी लोकांना वैद्यकीय सेवा द्यायला थोडीशी सुरुवात केली होती.
हेमलकसा येथे माडिया, गोंड आदिवासी राहत. मध्य भारतातील या आदिवासींनी त्यांच्या साध्या व सामूहिकपणे राहण्याच्या पद्धतीने बाबांना भुरळ घातली होती. शहरी लोकांना मालमत्तेच्या संग्रहाचा हव्यास असतो पण या माडिया लोकांना मात्र असा स्वतःसाठी वस्तूंचा संचय करणे म्हणजे काय याची जाणीवच नव्हती. त्यांच्याकडे ना जमीन, ना शेती. ते कपडेसुद्धा वापरत नव्हते. बाबांना या लोकांसाठी काहीतरी करायला हवे असे वाटत होते आणि त्यातूनच निर्माण झाला ‘लोकबिरादरी प्रकल्प’.
गडचिरोली जिल्ह्यातले हेमलकसा हे नितांतसुंदर रमणीय ठिकाण आहे. या प्रदेशात खळखळत्या झऱ्यांचे जाळे पसरलेले आहे. या झऱ्यांमुळे उन्हाळ्यातही इथे पाणी असते. त्यामुळे अर्थातच सर्वत्र घनदाट जंगल आहे. अनेक प्रकारचे वृक्ष वेली व त्यामुळे जंगली श्वापदांचा जास्त वावर इथे असतो.
माडिया लोकांचे आयुष्य अत्यंत अल्प. एखादाच माणूस चाळीशीपर्यंत जगायचा. जीवन अतिशय खडतर. आरोग्याच्या सुविधा नाहीत. एखादा माणूस आजारी पडला तर मंत्र, तंत्र, गंडा दोरे करायचे, नाही तर एखादे कोंबडे कापायचे अशी अंधश्रद्धा. त्यांना मराठी भाषा येत नसे. एखादे अपंग मूल जन्माला आले तर ते त्या मुलाला जंगलात टाकून देत असत. ते म्हणत, ‘इथे जंगलाचा कायदा चालतो.’
गरिबी असल्यामुळे शिक्षण नाही. शिक्षण नाही म्हणून गरिबी, असं दृष्टचक्र चालूच होते. आदिवासींमध्ये प्रचंड प्रमाणात कुपोषण होते. बाबांबरोबर जे कार्यकर्ते इथे कामाला आले ते मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात होते. पुढे स्विस एडच्या लोकांनी हेमलकसा प्रकल्पाला मदत केली. १९८५ पर्यंत त्यांनी घरे, दवाखाना, शाळा बांधायला मदत केली.
१९७३ पर्यंत हा भाग बाकीच्या जगापासून संपूर्णपणे तुटलेला होता. दाट जंगले, खळाळणारे झरे, आवाज फक्त वन्य प्राण्यांचा किंवा पाण्याचा. इथे वीज नव्हती, रस्ते नव्हते, पाणी नव्हते, माणसेही नव्हती. फक्त आजूबाजूला जंगलात लपून राहणारे आदिवासी होते. जगन मचकले, दादा पांचाळ, विलास मनोहर, गोपाळ फडणीस, शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित असे उत्साही कार्यकर्ते बाबांबरोबर काम करीत होते. प्रथम सर्वजण झाडाखाली राहत होते. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे हे सुद्धा एक आव्हानच होते. हळूहळू त्यांनी झोपड्या बांधल्या आणि राहण्याची सोय केली.
सुरुवातीला आनंदवनातूनच सर्व गोष्टी यायच्या. बाबांनी कुष्ठरोगातून बरे झालेल्या काही कार्यकर्त्यांना व त्यांच्या कुटुंबांना हेमलकसाला आणले. झाडे तोडणे, रस्ते बांधणे, खुदाई करणे, शेती करणे, विटा बनवणे, लाकूडकाम करणे अशी अनेक कामे करण्यात हे कार्यकर्ते गुंतून गेले. त्यांचे पुनर्वसन करण्याचे कामही यातून झाले, कारण कुष्ठरोग बरा झाला तरी समाज या लोकांना स्वीकारायला तयार नव्हता.
हळूहळू स्वयंपाकघर, अन्नधान्य ठेवण्यासाठी झोपडी, कार्यकर्त्यांसाठी झोपडी तयार झाली. बाबा अधूनमधून तिथे यायचे. बाकी सर्व जबाबदारी डॉ. प्रकाश व त्यांच्या पत्नी डॉ. मंदा यांनी स्वीकारली. डॉ. मंदा डिसेंबर १९७४ साली हेमलकसा येथे येऊन पोहोचल्या. त्यांच्यासाठी तर हे वातावरण अगदीच नवीन होते. संडास नव्हते, स्नानगृह नव्हते, अशी अवस्था होती. पण त्यांनी सर्व काही जमवून घेतले.
हेमलकसामध्ये हवामान अगदी टोकाचे असायचे. उन्हाळा अतिशय कडक असे आणि पावसाळ्यात धो-धो पाऊस कोसळायचा. इतका पाऊस पडायचा की हेमलकसाचा जगाशी संपर्क तुटून जायचा. मध्ये एक नदी लागायची. ती पार करण्यासाठी ‘डोंगा’ असे. डोंगा म्हणजे लाकडाचा ओंडका कोरून केलेली एक लहानशी होडी. बाबांना घोड्यावर बसण्यापासून विहीर खोदण्यापर्यंत सर्व काही येत होते. फक्त त्यांना पोहता येत नव्हते.
हेमलकसामध्ये काहीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे धान्य, भाजीपाला, औषधे व इतर सर्व सामान आनंदवनामधून येत असे. हेमलकसाच्या आजूबाजूला हजारेक गावे होती. पण तेथील लोक कंदमुळे खाऊन, शिकार करून राहायचे. त्यांना फळे, भाजीपाला, धान्य काही लागत नव्हते.
हेमलकसा येथील सुरुवातीचा काळ सगळ्यांनाच खूप कठीण गेला. झोपडीत साप, विंचू निघायचे. जेवायला पोळ्या नव्हत्या. जी मिळेल ती भाजी व भात असायचा. शिवाय आजूबाजूला लोक नव्हते. मनोरंजनाची काहीही साधने नव्हती. पण यामुळे सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्यात घट्ट अशी मैत्रीची वीण तयार झाली.
बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी फोन नव्हता की पोस्टाची पेटी नव्हती. उर्वरित जगाशी - विशेषतः आनंदवनाशी - संपर्क साधणारा एकच दुवा होता. तो म्हणजे नागेपल्ली येथे राहणारा जगन मचकले. जगन मचकले नागेपल्लीहून ६५ किलोमीटर अंतर सायकलवरून पार करून हेमलकसा गाठायचा. तो कधी सामान आणी, तर कधी बाबा आणि साधनाताई नागेपल्लीला आले आहेत, असा निरोप घेऊन येई. नागेपल्लीहून बाबा व साधनाताईंना बैलगाडी पाठवली जायची व ते खूप कष्ट सहन करीत हेमलकसाला येत असत. एवढे कष्ट सोसून सर्वजण हेमलकसा येथे राहत होते.
प्रथम आदिवासी लोक डॉक्टरांकडे येतच नव्हते. मलेरिया, सेरेब्रल मलेरिया हे तिथले मुख्य आजार होते. शिवाय सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यामुळे जखमी होणे, झाडावरून पडणे अशा छोट्या-मोठ्या समस्या असायच्या. येथील आदिवासींची भाषा माडिया होती. ती मराठीपेक्षा संपूर्णपणे वेगळी होती. माडिया लोक फारसे कपडे वापरत नसत. कमरेला एक फडके बांधायचे. डॉ. प्रकाश यांनीही अर्धी चड्डी व कोपरीसारखा शर्ट वापरायला सुरुवात केली. बाहेर जाताना ते लेंगा व शर्ट घालीत.
हळूहळू माडिया लोकांचा डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाताई यांच्यावर विश्वास बसू लागला. या लोकांमध्ये अंधश्रद्धा फार मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे सर्व आजारांसाठी ते मांत्रिकाकडे जात असत. हळूहळू सर्वांनी माडियांची भाषा शिकून घेतली. ‘माडिया गोंड’ ही आदिवासी जमात खूपच मागासलेली होती. जंगलात लपून राहणारे हे आदिवासी होते. कमालीचे अज्ञान व अफाट दारिद्र्य त्यांच्यात होते. दोन वेळेला पुरेसे खायला मिळत नसे, अशी बिकट परिस्थिती होती.
हेमलकसा येथे प्रथम बालमृत्यूचे प्रमाण खूप होते. बाळंतपणे घरातच केली जायची. हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली. डॉ. प्रकाश हेमलकसाला सर्व प्रकारची ऑपरेशने करीत असत. हळूहळू येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली. रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईकसुद्धा यायचे. त्यांच्या राहण्याची सोयही केली गेली. अनेकदा जीवावरचे प्रसंगसुद्धा आले.
हेमलकसा हळूहळू सुधारू लागले. तेथे शाळा काढल्या गेल्या. शिक्षण पद्धतीमध्ये नावीन्य आले. आदिवासी मुलांसाठी तयार केलेली ‘प्रयोगात्मक शिक्षण पद्धती’ वापरली जाऊ लागली. शिक्षण, आरोग्य, सामुदायिक सहभाग या क्षेत्रात नवीन उपक्रमांमुळे समाज अधिक सशक्त बनत गेले. लोक शेती करायला लागले. हळूहळू ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यायला लागले आणि याचे श्रेय डॉ. प्रकाश, डॉ. मंदाताई आणि इतर कार्यकर्त्यांचे अविरत कष्ट व चिकाटी यांना जाते.
हेमलकसा इथे डॉ. प्रकाश यांनी अनेक प्राणी पाळले. बिबट्या, वाघ, साप, हरिण, खारी, कुत्रे असे अनेक प्राणी तेथे आनंदात बागडत. आमटे घराण्याची पुढची पिढी हेमलकसा इथे काम करू लागली.
डॉ. प्रकाश त्यांच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकात लिहितात, ‘आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावे, त्यांची पिळवणूक थांबावी व त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असे बाबांच्या मनात होते. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांनी दाखवलेला विश्वास, ताईची माया व मंदाची भक्कम साथ यामुळेच हे काम इथवर येऊन पोहोचले.’
हेमलकसाच्या ‘लोक बिरादरी’ प्रकल्पाबद्दल ते पुढे म्हणतात, ‘१९७३ मध्ये आम्ही हेमलकसा परिसरात काम सुरू केले तेव्हा येथील माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेले होते. पण आम्ही एकेक काम उभारत गेलो आणि त्यातून येथील जीवन बदलत गेले. आता येथे आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. मुले शाळेत शिकून शहाणी होत आहेत. बाहेर जाऊन नोकऱ्या करत आहेत. येथे आता शेती पिकू लागली आहे. हेमलकसाचा प्रवास असा ‘अंधारातून उजेडाकडे’ होत आहे.’
हेमलकसा येथे गेल्यावर बाबांना कळून आले की माडिया लोकांना त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील इतकेही धान्य, मीठ, रॉकेल अशा गोष्टी मिळत नव्हत्या. खरे तर त्यांच्या गरजा अत्यंत अल्प होत्या. ते एकत्रितपणे शिकार करीत आणि आपसांत ती वाटून घेत. पुढे बाबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आनंदवनातून मीठ व रॉकेल आणून त्याचे वाटप करायला सुरुवात केली. कोणत्या गावातील किती लोक मीठ व रॉकेल घेऊन जातात, याची नोंद ठेवायला सुरुवात झाली. कधी कधी बसमधून मीठ घेऊन बाबा एका गावाहून दुसऱ्या गावी मीठ वाटप करायला जात. अशावेळी त्यांची तहानभूक हरवत असे. बेभान होऊन काम पूर्ण करणे, हा त्यांचा स्वभावच होता. हळूहळू बाबांच्या मार्गदर्शनाखाली अशी कामे केल्यामुळे माडियांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. त्यांनी शेतीकामात मदत केली तर त्यांना योग्य मोबदला मिळतो का नाही, यावर बाबा लक्ष ठेवत. या सर्व प्रयत्नांमुळे दुकानदार व व्यापारी त्यांना योग्य भावात वस्तू देऊ लागले. सरकारी योजना माडियांपर्यंत पोहोचू लागल्या.
बाबांचा दृष्टिकोन आदिवासींच्या बाबतीत वेगळाच होता. ते दूरदृष्टीने विचार करीत असत. कुठल्याही समस्येवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा अशा समस्या भविष्यात उद्भवणारच नाहीत, असे करावे, ही त्यांची विचारधारा होती. बाबांचे सर्व विचारच आगळे-वेगळे होते, म्हणूनच त्यांच्या हातून भव्य-दिव्य कार्य घडू शकले.
कोणीतरी एकदा बाबांना विचारले, ‘तुम्ही सुरू केलेल्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये जेव्हा आदिवासी येत नव्हते, तेव्हा तुम्हाला नैराश्य नाही का आले?’ त्यावर बाबा म्हणाले, ‘माडिया लोकांची सेवा करण्याचा निर्णय माझा होता. आमच्या येथे येऊन हॉस्पिटल काढा, असे त्यांनी काही आम्हाला सांगितले नव्हते. त्यामुळे ते उपचार करून घ्यायला येतील, अशी माझी अपेक्षा नव्हती.’
माडिया लोकांची वेदना सहन करण्याची क्षमता प्रचंड होती. ते दवाखान्यात जात नसत. पण लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यावर त्यांचा इतका विश्वास बसला की ते रुग्णाला खाटेवर झोपवून मैलोनमैल चालत हेमलकसा येथे येत. सुरुवातीला हेमलकसा येथे कशाचीही सोय नव्हती. रात्री कंदिलाच्या प्रकाशात ऑपरेशन करावे लागे.
पुढे १९७६ साली हेमलकसाला माडिया लोकांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली. प्रथम त्या लोकांना आपल्या मुलांना शिकायला शाळेत पाठवणे, ही कल्पना पसंत नव्हती; पण हॉस्पिटलला प्रसिद्धी मिळाली होती. मुलांना तीन वेळा पोटभर जेवायला मिळणार, राहायला मिळणार, म्हणून माडियांची मुले शाळेत येऊ लागली. बाबांना वाटत होते, माडियांची राहणी, त्यांची जगण्याची पद्धत, हे सगळे सुसंस्कृत जगाकडून नष्ट केले जाईल. त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे नवीन शतकाशी जमवून घेण्यासाठी मुलांना शिक्षण देणे. पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या संस्कृतीविषयी आदर वाटेल, हे पाहणे महत्त्वाचे. १९७६ साली शाळेत फक्त २५ मुले होती. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डॉ. प्रकाश यांचा मुलगा दिगंत हा याच शाळेत माडिया मुलांबरोबर बारावीपर्यंत शिकला. तो आणि आणखी चार, अशी पाच मुले डॉक्टर झाली. काही विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणसुद्धा घेतले. काहीजण तेथेच शिक्षक म्हणून काम करू लागले.
बाबांच्या कार्यकर्त्यांनी माडिया लोकांना शेती करायला शिकवले. ते धान्य पिकवू लागले. पूर्वी ते फक्त शिकार करून पोट भरत, पण त्यामुळे त्यांच्यात कित्येक जीवनसत्त्वांची कमतरता होती. परंतु नंतर हे लोक भाजीपाला आणि धान्य पिकवू लागले. पुढे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई यांचा मुलगा डॉ. दिगंत व त्याची स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नी डॉ. अनघा हेमलकसा येथे काम करू लागले. बाबांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत पुढच्या पिढ्यांनी स्वेच्छेने स्वीकारले.