बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
१९५१ साली विनोबांनी आनंदवनाचे उद्घाटन केले. १९५४ पर्यंत आनंदवन सर्व बाजूंनी बहरू लागले. १९५६ मध्ये बाबांनी नागपूरपासून काही मैलांवर ‘अशोकवन’ ही दुसरी कुष्ठरोग्यांची वस्ती स्थापन केली. यावेळपर्यंत आनंदवनात वीज नव्हती. रॉकेलचे दिवे वापरले जायचे पण १९५७ मध्ये आनंदवनामध्ये वीज आली आणि पहिली प्राथमिक शाळा उघडली गेली. पुढे १९६० मध्ये अंध मुलांसाठी ‘सनशाईन होम’ सुरू झाले. एकीकडे कुष्ठरोग्यांची संख्या वाढतच होती. त्यावेळी फोन नव्हते त्यामुळे इतर लोकांशी पत्राद्वारे संपर्क ठेवावा लागत असे. त्यासाठी १९६२ मध्ये आनंदवनात पोस्ट ऑफिस सुरू झाले. याचवेळी ‘मुक्तीसदन’ देखील सुरू करण्यात आले, ज्याचे उद्घाटन विदर्भाचे संत तुकडोजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
मुक्तीसदन
बाबांचा मित्रपरिवार फार मोठा होता. देशविदेशातील लोक त्यांचे मित्र होते. तार्नोव्हस्की, स्नेलमन, ऑप्लिगर हे त्यातील काही स्नेही. स्वित्झर्लंडचे डॉ. स्नेलमन हे ‘स्विस एड ॲब्राड’ चे अध्यक्ष. त्यांनी त्यांच्या देश बांधवांना आनंदवनाची ओळख करून देण्यासाठी एक लेख लिहिला. तो लेख वाचून स्वित्झलँडमधील अनेक नागरिक भारावून गेले आणि त्यांनी एक दिवस उपवास करून पैसे वाचवले आणि आनंदवनातील रोगमुक्त झालेल्या लोकांसाठी पाठवले. त्यातून जो प्रकल्प तयार झाला तो म्हणजे ‘मुक्तीसदन’. मुक्तीसदन हे आनंदवनाचे धाकटे भावंड. महाराष्ट्र राज्याने यासाठी अडीचशे एकर जमीन दिली. राष्ट्रपतींनी चाळीस हजार रुपये दिले. स्वित्झर्लंडमधील लोकांनी घरे बांधण्यासाठी त्र्याण्णव हजार रुपये दिले, तर ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांच्या एका गटाने शेती अवजाराच्या कारखान्यासाठी पंचवीस हजार रुपये दिले. अमेरिकेतून पंचवीस हजार रुपयांचा निधी मिळाला. थोडक्यात, जगातील अनेक देशांनी बाबांच्या कार्याची दखल घेतली आणि उदारहस्ते त्यांना, त्यांच्या प्रकल्पांना आर्थिक मदत केली ही बाबांच्या कामाला मिळालेली मौल्यवान पावतीच होती.
१७ नोव्हेंबर १९६२ रोजी तुकडोजी महाराज यांच्या हस्ते मुक्तीसदनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते म्हणाले, “या रोगाबद्दलचे ज्ञान घराघरात पोहोचले पाहिजे. एक वेळ तुम्ही पोथ्या-पुराणे वाचली नाहीत तरी चालेल, पण कुष्ठरोग हा एक रोग आहे हे माणसाने समजून घेतले पाहिजे.”
१९६२ मध्ये अकरा जोडप्यांना आणि इतर रुग्णांना निवासासाठी जागा देण्यात आली. त्यांनी २५० एकर जमिनीवर ‘सहकारी सोसायटी’ सुरू केली. या जमिनीवर फक्त शेतीच करायची आणि जास्तीचे उत्पादन आनंदवनाला द्यायचे, असे ठरविण्यात आले.
मुक्तीसदनानंतर १९६९ साली ‘सुखसदन’ व ‘स्नेह सावली’ ही आणखी दोन निवासस्थाने बांधण्यात आली. १९८१ मध्ये त्यात ‘स्विस एड’ च्या अनुदानातून ‘कृषीनिकेतन’ची भर पडली.
मुक्तांगण
आनंदवनामध्ये आठवड्यातून दोन वेळा भजने म्हटली जायची. त्याशिवाय काही लोक नाटके बसवत आणि ती सादर करत. भारतावरील चिनी आक्रमणाच्या वेळी या कुष्ठरोग्यांनी एक नाटक बसवून सादर केले. त्यातून त्यांना अडीच हजार रुपये मिळाले. ते त्यांनी भारत सरकारच्या संरक्षण निधीला पाठवले. राष्ट्राच्या संकट काळात ‘आम्हीही काही करू शकतो, इतरांच्या बरोबर आम्ही पण जबाबदारी उचलतो,’ हे त्यांनी दाखवून दिले. एकदा पु. ल. देशपांडे आनंदवनात आले होते. त्यांनी आनंदवनातील अपंगांसाठी, अंधांसाठी आणि व कुष्ठरोग्यांसाठी एक स्टेज बांधायचे ठरवले. १९७४ साली त्यांनी या कामासाठी एक लाख रुपये दिले. या थिएटरचे नाव ‘मुक्तांगण’ असे ठरले. मुक्तांगणात एक बंदिस्त सभागृह आणि एक खुला रंगमंच बांधण्यात आला. सभोवताली उंच अशोक वृक्ष लावण्यात आले. तिथे चर्चासत्रे, सामुदायिक विवाह, करमणुकीचे कार्यक्रम व नाटके यासाठी या वस्तूचा उपयोग करण्याचे ठरले.
आनंदवन मित्र मेळावा
१९६१ साली आनंदवनामध्ये एक नवीन उपक्रम सुरू झाला. तो म्हणजे ‘मित्र मेळावा’. या मेळाव्याला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील श्रेष्ठ मंडळी येऊ लागली. यात साहित्यिक, संगीतकार, कलावंत, राजकारणी इत्यादींचा समावेश होता. या तीन दिवसीय मेळाव्यात निरनिराळे कार्यक्रम होऊ लागले. व्याख्याने, चर्चासत्रे, रोगमुक्त झालेल्या लोकांचे सामुदायिक विवाह असे नानाविध कार्यक्रम या कार्यक्रमात होऊ लागले. निरनिराळ्या पाहुण्यांना आमंत्रणे दिली जात व सर्वजण या मेळाव्याचा आनंद लुटत. बहुतेक सर्वजण आनंदवन पाहण्यासाठी येत. ‘आनंदवन’ या नावाला साजेसा आनंदीआनंद या कार्यक्रमात भरून राहत असे. तो आनंद सांसर्गिक झाला.
या मेळाव्यामध्ये ‘बाल-तरूंची पालखी’ हे एक वेगळेच आकर्षण असे. बाल-तरुंची पालखी ही एक वेगळीच संकल्पना आहे. माणसाने निसर्गाची लूट केलेली आहे. स्वतःच्या हव्यासापायी जंगलेच्या जंगले तोडली जातात. हा निसर्गावर अत्याचार आहे. यामुळे निसर्गातील समतोल ढळतो आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. माणूस आणि निसर्ग यांच्यामधील बिघडलेला तोल सावरायला हवा. बाबा निसर्गाला खूप महत्त्व देत. त्यांच्या संकल्पनेत निसर्गाला मोठे स्थान आहे, म्हणून ही बाल-तरूंची पालखी ही कल्पना. रवींद्रनाथ टागोरांनी ‘शांतिनिकेतन’ मध्ये कोवळ्या रोपाला समारंभपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी ही प्रथा सुरू केली. या दिवशी समारंभपूर्वक वृक्ष म्हणजे रोपटी लावण्याची प्रथा आहे. कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांनी या समारंभाकरिता एक सुंदर गीत रचले होते. त्याची सुरुवात अशी आहे,
कोवळ्या रोपट्या आज तू पाहुणा | भूषवी अंगणा येऊनिया |
या मेळाव्यात बरे झालेल्या कुष्ठरुग्णांचे सामुदायिक विवाह देखील साजरे केले जात. कुष्ठरोग्यांना समाजाने वाळीत टाकलेले होते. हा रोग संसर्गजन्य आहे अशी समजूत होती, म्हणून हे रोगी बहिष्कृत होते. पण त्यांनाही आपला विवाह व्हावा, आपल्याला जीवनाचा साथीदार मिळावा, मुले व्हावीत, ही नैसर्गिक भावना असते. हे लक्षात घेऊन आनंदवनामध्ये दरवर्षी या मेळाव्यामध्ये कुष्ठमुक्तांबरोबरच अपंग व निरोगी लोकांचे सामुदायिक विवाह होत. हा समारंभ अगदी प्रेक्षणीय होत असे.
उत्तरायण
१९७९ साली बाबांनी ‘उत्तरायण’ ही संस्था सुरू केली. याला बाबा आनंदवनाची ‘ज्ञानपेढी’ म्हणत. निवृत्ती घेतल्यानंतर माणसे इथे येऊन राहू शकत आणि आनंदवनाच्या कार्यात सहभागी होऊ शकत. वयाच्या ५८ व्या वर्षी माणूस नोकरीतून निवृत्त झाला तरी तसा वृद्ध झालेला नसतो. त्याच्यात उत्साह असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात, म्हणून उत्तरायणामध्ये येऊन समाजासाठी काही काम करू शकतो. खरे तर निवृत्तीनंतर माणसाने आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने समाजासाठी, लोकांच्या कल्याणासाठी वेळ द्यावा. पु. ल. देशपांडे म्हणतात, “इथे आलेल्या वृद्ध बापाला भेटण्यासाठी तरुण पोरगा येईल तेव्हा मनाने आपणच वृद्ध असल्याची जाणीव त्याला झाल्याशिवाय राहणार नाही.” सेवानिवृत्तांनी ‘समाजप्रवृत्त’ व्हावे अशी बाबांची कल्पना. याविषयी बाबांनी एक नवीन कल्पना ‘एक खिंड मी लढवीन’ या गीतातून मांडली आहे. या गीतात ते लिहितात:
‘वानप्रस्थ वृत्ती’ निसर्गात आहे, शेवटच्या दिवसात पाखरू घरट्यात राहत नाही आणि गुहेत मेलेला सिंह आढळणार नाही…
वानप्रस्थ वृत्ती म्हणजे पोटासाठी इच्छेविरुद्ध ज्याला जगायला लागले होते त्याला स्वतःच्या इच्छेने जगण्याची संधी. बाबांची ही जी इच्छा होती त्याप्रमाणे उत्तरायणमध्ये अनेक निवृत्त लोक येऊन राहू लागले आणि आनंदवनासाठी काम करू लागले. ‘उत्तरायण’ ही अत्यंत सकारात्मक प्रेरणा देणारी संस्था आहे. निवृत्त झाल्यानंतर माणसाला वाटू लागते की मी आता काही कामाचा नाही. त्यामुळे नैराश्य येऊ लागते. पण आनंदवनातील उत्तरायणमध्ये आल्यानंतर निवृत्त लोकांचा उत्साह वाढतो आणि ते निरनिराळ्या कामांत सहभागी होतात.
गोकुळ
आनंदवनामध्ये बाबांनी अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी एक संस्था सुरू केली. तिचे नाव ‘गोकुळ’. या गोकुळची सुरुवात कशी झाली यामागे एक कहाणी आहे. वरोडा स्टेशनवर टाकून दिलेली एक मुलगी कोणीतरी बाबांकडे आणून दिली आणि ‘या मुलीचा सांभाळ करा’ अशी बाबांना विनंती केली. अनाथ, टाकून दिलेल्या मुलांचा प्रश्न फार मोठा आहे. अशा मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, त्यांच्या पोषणाचा, शिक्षणाचा खर्च केला पाहिजे, हे बाबांना तीव्रतेने जाणवले. पुढे १९५४ मध्ये जंगलात एका खड्ड्यात टाकून दिलेली मुलगी कोणीतरी साधनाताईंना आणून दिली. साधनाताई या मुलीची आई झाल्या. अशा प्रकारे मुला-मुलींची संख्या वाढत गेली. या मुलांसाठी इमारत कशी उभी करायची हा मोठा प्रश्न बाबांसमोर होता. ‘साने गुरुजी कथामाले’चे कार्याध्यक्ष श्री प्रकाश मोहाडीकर यांनी महाराष्ट्रातील शाळकरी मुलांकडून पैसे जमवले. शाळा चालकांनी या कार्यात त्यांना मदत केली आणि साने गुरुजींच्या ८१ व्या वाढदिवशी दादरमध्ये ‘राजा शिवाजी विद्यालया’च्या प्रांगणात हजारो मुलांच्या उपस्थितीत बाबांना निधी अर्पण केला गेला. या निधीतून गोकुळची इमारत उभी राहिली.
समाजाला मदतीचा हात
आनंदवनाचे वैशिष्ट्य असे आहे की या संस्थेने इतरांकडून मदत घेऊन स्वतःचा विकास केला, पण एवढ्यावरच ही संस्था थांबली नाही, तर तिने इतरांना मदतीचा हात दिला. बाबांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिक्षण. ‘शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया आहे,’ असे बाबा म्हणत. ‘शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होऊ शकणार नाही,’ असे त्यांना मनापासून वाटत असे. वरोडा भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा होत्या पण कॉलेज नव्हते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे शिकायचे असेल तर मुलांना नागपूर किंवा चंद्रपूरला जावे लागे आणि ही गोष्ट सर्वांना परवडण्यासारखी नव्हती. खरंतर बाबांना मेडिकल कॉलेज सुरू करावे असे वाटत होते. परंतु सेवाग्रामला मेडिकल कॉलेज काढले, त्यामुळे बाबांना मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली नाही. मग त्यांनी आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज सुरू करायचे ठरवले. ही गोष्ट आहे १९६२-६३ सालची. आनंदवनात कॉलेजची इमारत बांधायची असे ठरले. कुष्ठरोग्यांनी कष्ट करून सुंदर इमारत उभी केली. परंतु विद्यार्थी व शिक्षक मिळवणे खूप कठीण गेले. लोकांना वाटत होते की प्राध्यापक कुष्ठरोगी असतील. बाबांनी प्राध्यापकांना जास्त पगार देऊ केला आणि नोकरीला ठेवले. प्राध्यापकांची राहण्याची सोय केली. जे एकटे येणार होते त्यांच्या जेवणाची सोय केली. मुलाखत घेत असताना बाबांनी प्रत्येक प्राध्यापकाची आपुलकीने चौकशी केली. त्यांच्या जाण्या-येण्याची, जेवणाची उत्तम सोय केली. यामुळे पहिल्याच भेटीत प्राध्यापक बाबांच्या प्रेमात पडले आणि कॉलेजमध्ये रुजू झाले. बाबांनी कृषी शिक्षणासाठी सुद्धा एक कॉलेज सुरू केले.
सुरुवातीला कॉलेजमध्ये मुलींची संख्या कमी होती. म्हणून बाबांनी मुलींसाठी मोफत बस सेवा सुरू केली. बाबा व्यवहारी होते. परंतु त्यांच्यामध्ये लोकांसाठी जिव्हाळा, आपुलकी होती म्हणूनच ते आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा अशा ठिकाणी फार मोठे काम करू शकले. बाबांना एकदा कोणी भेटला की ते लोक बाबांच्या कार्यात सहभागी होत असत.
प्रथम बाबांनी कॉलेजच्या कामात स्वतः लक्ष घातले, पण सर्व सुरळीत झाल्यावर त्यांनी कॉलेजच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही. अशा प्रकारच्या त्यांच्या वागणुकीमुळे लोक आपापले काम मन लावून व्यवस्थितपणे पार पाडत असत.
१९६६ मध्ये बाबांनी ‘आनंद अंध विद्यालय’ स्थापन केले. अंध, मूकबधिर व अपंगांसाठी बाबांचा जीव नेहमीच तुटायचा. आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटायचे. एकदा एक अंध संगीत-शिक्षक विदर्भात नोकरी शोधत हिंडत होता. कुणीतरी त्याला सांगितले, ‘आनंदवनात जा, बाबा आमटेंना भेट, ते तुम्हाला मदत करतील.’ त्याप्रमाणे तो शिक्षक बाबांना येऊन भेटला. बाबांच्या डोक्यात अंधांसाठी काहीतरी करावे हे घोळतच होते. यातूनच अंधशाळा निर्माण झाली. अंधांची शाळा सुरू झाल्यावर काही वर्षांनी कर्णबधिरांसाठी शाळा सुरू झाली. या शाळेत अनेक मुलं-मुली शिक्षण घेऊ लागले. संधिनिकेतनमधून काही कौशल्यं आत्मसात करून त्यांना नोकरी मिळवण्याची सोयही केली गेली. वेगवेगळ्या कौशल्यात प्रावीण्य मिळवून बरीचशी मुले आपापल्या गावी परत गेली आणि समाजात आत्मसन्मानाने जगू लागली.
१९६८ मध्ये आनंदवनामध्ये विवाहित रुग्णांसाठी ‘सुखसदन’ आणि वृद्ध लोकांसाठी ‘स्नेहछाया’ या दोन इमारती बांधल्या गेल्या.