बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
हळूहळू आनंदवनाचा विस्तार होऊ लागला. १९५४ सालापर्यंत रुग्णांची संख्या वाढत गेली. डॉ. शिवाजीराव पटवर्धनांच्या तपोवनातून आणि बाहेरूनही कुष्ठरोगी आनंदवनात येऊ लागले. या रोग्यांनी सहा विहिरी खणल्या. शेती होऊ लागली. भाजीपाला पिकवला जाऊ लागला. आनंदवनाची गरज भागवून भाजीपाला उरू लागला. मग बाबांनी हा भाजीपाला बाजारात नेऊन त्याची विक्री करायची, असे ठरविले. यामुळे कुष्ठरोगी व समाज यांच्यामधली दरी कमी व्हायला मदत होऊ शकली असती. मालाचा दर्जा उत्तम असला पाहिजे हे बाबांचे ब्रीद असल्यामुळे त्या रसरशीत ताज्या भाज्या पाहून काही सुजाण लोक भाज्या खरेदी करू लागले आणि हळूहळू विक्री वाढू लागली. यातून कुष्ठरोगाबद्दलचा गैरसमज कमी झाला नाही, पण एक फायदा झाला, तो म्हणजे बरा झालेला कुष्ठरोगी एक दयापात्र, आत्मविश्वास गमावलेला माणूस राहिला नाही. त्याला मीही काही करू शकतो असे वाटू लागले. त्याचा आत्मसन्मान जागृत झाला.
१९५६ साली आनंदवनात हरियाणा, पंजाब प्रांतातून गायी आणण्यात आल्या. परंतु इथे दूध काढायला कोणी माणूस मिळेना. कुष्ठरोग्यांच्या संपर्कात येणे बाहेरचे लोक टाळत असत. शेवटी गायींचे दूध काढण्याचे काम साधनाताईंवर आले. दूध गोठल्यामुळे गायींच्या कासी ताठरलेल्या होत्या. पण साधनाताईंनी हार मानली नाही. त्यांनी गायींच्या लाथा खाल्ल्या, त्यांचे हात सुजले, पण नंतर दूध काढण्यात त्या पारंगत झाल्या. ‘कुठलेही काम हाती घेतले की ते यशस्वी करून दाखवायचे’ हा या दोघा पती-पत्नीने घेतलेला वसाच होता. यानंतर काही दिवसांनी ‘सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ (एम.सी.आय.) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ५० स्वयंसेवक भारतात आले होते. ‘डीड्स, नाॅट वर्डस’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. यात ३७ देशांतून वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक होते. ते सर्वजण तीन महिने आनंदवनात राहिले, त्यांनी तिथे एक दवाखाना आणि हॉस्पिटल बांधले. ते सर्वजण कुष्ठरोग्यांशी मोकळेपणाने मिळून मिसळून वागत. हे पाहून वरोड्यातील रहिवाशांचा गैरसमज दूर होण्यास मदत झाली आणि ते आनंदवन पाहायला येऊ लागले. आनंदवनातील सुंदर, स्वच्छ वसाहत पाहून लोकांच्या मनातल्या कुष्ठरोगाबद्दलचे गैरसमज दूर होऊ लागले. काही दिवसांत आनंदवनात पिकलेल्या भाजीपाल्याची आणि फळांची विक्री जोरात सुरू झाली. गोरे लोक इथे येऊन राहत आहेत, कष्ट करत आहेत, राबत आहेत म्हणजे हे काहीतरी ‘वेगळे आणि चांगले’ आहे, असे वरोड्यातील लोकांना वाटू लागले. याचा फायदा असा झाला की, आजूबाजूचे रहिवासी आणि आनंदवन यांच्यामधली दरी कमी झाली. हळूहळू गावातले लोक श्रमदान करायला आनंदवनात येऊ लागले. अशा रीतीने बाहेरच्या जगातले लोक आनंदवनाला मदत करू लागले.
वैद्यकीय सेवा
आनंदवन रुग्णालय सर्व कुष्ठरोग्यांना प्रवेश देत असे. तिथे साठ खाटांची सोय उपलब्ध होती. या रुग्णालयाखेरीज ‘महारोगी सेवा समिती’ तीन उपचार केंद्रे चालवीत होती. कुष्ठरोग बरा झालेले लोकच सेवक, परिचारिका, प्रयोगशाळा सेवक, आरोग्य सेवक अशी विविध कामे करत. कुष्ठरोगावरील उपचारांत आधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला जाई. ‘सर्वेक्षण, आरोग्यशिक्षण व औषधोपचार’ ही पद्धत बाबा प्रथमपासूनच वापरत होते आणि तीच पद्धत नंतर सरकारने कुष्ठ निर्मूलन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वीकारली.
१९५७ मध्ये बाबांनी आनंदवनाभोवती असलेल्या ३० मैल परिघातील क्षेत्रात अकरा उपचार केंद्रे चालू केली. या काळात बाबा पहाटे तीन वाजता उठत व चार वाजता डबा घेऊन उपचार केंद्रात जात. प्रत्येक केंद्रात ते आठवड्यातून एकदा तरी जात आणि रोग्यांना औषधपाणी करीत असत. हे काम उरकून आनंदवनात परत आल्यावर आनंदवनातील रुग्णांवर उपचार करीत असत. अविरत कष्ट चालू होते, कारण बाहेरून कोणी डॉ. आनंदवनात कामाला यायला तयार नव्हता. बाबा रोग्यांच्या जखमा धुणे, त्यांना औषधे देणे, इंजेक्शन देणे सर्व कामे स्वतःच करीत. खरेतर बाबा वैद्यकीय पदवीधर नव्हते, पण ते प्रशिक्षित कार्यकर्ता होते. पुढे १९६१ मध्ये प्रख्यात कुष्ठरोग तज्ञ व हाडांचे सर्जन डॉ. पॉल ब्रँड यांनी पत्र लिहून बाबांचे खूप कौतुक केले.
१९७४ मध्ये डॉ. विकास आमटे बाबांच्या कार्यात सामील झाले व आनंदवनाच्या हॉस्पिटलची जबाबदारी त्यांनी अंगावर घेतली.
या वेळेपर्यंत आनंदवन, अशोकवन, सोमनाथ इथेही कुष्ठ कार्य सुरू झाले होते. एक वर्षभर डॉ. प्रकाश व त्यांच्या पत्नी डॉ. मंदा यांनी अशोकवनामधील कामाची जबाबदारी स्वीकारली. डॉ. भारती (डॉ. विकास यांच्या पत्नी) आनंदवन हॉस्पिटलमध्ये काम करीत.
१९८१ साली आनंदवनात बहु औषधोपचार पध्दत सुरू करण्यात आली. १९८४ मध्ये डाॅ. पोळ आनंदवनात रुजू झाले. अशा पद्धतीने डॉ. लोक आनंदवनात कामाला आले व बाबांचा भार हलका झाला.
सुरुवातीला चंद्रपूर जिल्हा सरकारच्या ‘कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा’त समाविष्ट नव्हता. त्यामुळे कुष्ठरोगी शोधून त्यांच्यावर उपचार करणे, हे काम सरकारी यंत्रणेकडून सुरू झालेले नव्हते. ते काम बाबांनी सुरू केले. अगदी प्रथम कुष्ठरोगावर एकच औषध उपलब्ध होते. ते म्हणजे डायमिनो डायफेनिल सल्फोन (डी. डी. एस.). बरेचसे रुग्ण कमी जास्त प्रमाणात हे औषध घेऊन बरे होत असत. पण पुढे असे कळून आले की कुष्ठरोगाचे जंतू या औषधाला ‘इम्युन’ झाले आहेत. मग एकापेक्षा जास्त प्रकारची औषधे वापरायला सुरुवात झाली.
बाबांच्या या कामात हातभार लावणाऱ्या सिस्टर लीला (मूळ नाव गॅव्हरिलिया पापायानी) यांनी ग्रीसमध्ये फिजिओथेरपीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले होते. १९५६ मध्ये वयाच्या साठीनंतर त्या आनंदवनात आल्या आणि इथल्याच होऊन गेल्या.
माळरान हिरवे झाले
बाबांना जेव्हा प्रथम पन्नास एकर जंगलसदृश जमीन मिळाली तेव्हा तिथे पाण्याची काहीही सोय नव्हती. बाबांनी सहा कुष्ठरोग्यांच्या मदतीने प्रथम विहीर खणण्याचे काम हाती घेतले. आजूबाजूचे लोक त्यांना हसत होते, त्यांना वाटत होते की या खडकाळ जमिनीमध्ये पाणी कुठून असणार? पण काही फुटांवर पाणी लागले आणि सर्वांचे कष्ट फळाला आले. बाबा सांगतात, ‘माळरानावर हिरवी राने डोलू लागली. गिट्टीच्या खदानीतून पाचूचे बेट आणि सुखसदने निर्माण झाली. वेदनेचा पहाड कोरता कोरता आपण हे सुखाचे कैवल्य लेणे कोरीत होतो.”
एकदा पाणी लागल्यावर आनंदवनात अनेक विहिरी खोदल्या गेल्या. जमीन नांगरली जाऊ लागली. बाबांना शेती करण्याचा अनुभव नव्हता, पण बहुतेक कुष्ठरोगी शेतकरी होते. बाबा त्यांच्याकडून शेतीचे धडे घेऊ लागले. शिवाय अगदी आडबाजूला असूनही ते जगातल्या शेतीच्या प्रयोगांकडे लक्ष ठेवून होते. त्यांनी आनंदवनात शेतीचे अनेक नवे प्रयोग केले. नवे तंत्रज्ञान वापरले. १९५६-५७ मध्ये बाबांनी आनंदवनात स्प्रिंकलर्स बसवले. त्यावेळी त्या भागात कोणीही स्प्रिंकलर्स बसवले नव्हते. मध्य भारतातला पहिला ट्रॅक्टर आनंदवनात आला. विहिरीतून पाणी काढण्यासाठी बाबांनी विहिरीवर मोट बसवली, पण नंतर ते डिझेल इंजिन वापरू लागले.
१९६० साली आचार्य अत्रे आनंदवनात आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ‘मराठा’ वर्तमानपत्रात लिहिले, “एखाद्या शेतकी कॉलेजात शेतीविषयक जे प्रयोग कोणी करत नाही, ते आज आनंदवनात महर्षी आमटे गुरुजी कुष्ठरोग्यांकडून करून घेत आहेत. कोथिंबिरीपासून उसापर्यंत सर्व अन्नधान्य इथे पिकते आहे.”
आनंदवनातील शेती कोरडवाहू होती. पावसाच्या पाण्यावर शेती व्हायची, त्यामुळे ज्वारी, बाजरी, मका, कापूस व भाजीपाला एवढेच उत्पादन व्हायचे. विहिरींचे पाणी फक्त पिण्यापुरतेच होते. त्यामुळे वर्षभर पिके घ्यायची असतील तर पाण्याचा मुबलक साठा आवश्यक होता. आनंदवन थोडेसे उंचावर असल्यामुळे जमिनीला उतार आहे. पावसाचे पाणी वाहून जात असे. पुढे १९७८-७९ मध्ये डॉ. विकास यांनी एक तलाव खोदण्याचे काम सुरू केले. पुढच्या पावसाळ्यात तलाव पूर्ण भरला आणि प्रयोग यशस्वी झाला.
डॉ. विकास त्यांच्या ‘आनंदवन प्रयोगवन’ या पुस्तकात लिहितात, “मीही बाबांसारखे अचाट प्रयोग करत असे. आमच्याकडे प्रयोग करायला कुणाची ना नव्हती.” डॉ. विकास यांनी भूगर्भशास्त्रज्ञांची मदत घेतली, तेव्हा कळले की, आनंदवनातली एका बाजूची जमीन वेगळ्या प्रकारची आहे. तिथे खणले तर पाणी मिळण्याचा संभव आहे. जमिनीत खोल खणण्यासाठी मशीन हवे. मशीन विकत घेण्याइतके किंवा भाड्याने घेण्याइतके पैसे नव्हते. शेवटी १९८४ साली सौराष्ट्रातून एक कॅलिक्स ड्रिलिंग मशीन मिळाले. पण कामाला यश येत नव्हते. शेवटी केंद्रीय खाणमंत्री वसंत साठे यांच्या मदतीने एक जुने कोअर ड्रिलिंग मशीन मिळाले आणि गोगलगायीच्या गतीने काम सुरू झाले. विकास बाबांचाच मुलगा. डॉक्टर असूनही इतर क्षेत्रात अभ्यास करून नवीन प्रयोग करीत होता. शेवटी नवीन तलाव खोदले गेले. विहिरी खोदल्या गेल्या. जुन्या तलावातला व विहिरीतला गाळ काढला आणि आनंदवनाला मुबलक पाणी मिळू लागले. पाणी आल्यामुळे वर्षातून दोन-तीन पिके काढता येऊ लागली. कडधान्ये पिकू लागली. सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, जवस, करडई, मोहरी अशी तेलबियांची पिके घेतली जाऊ लागली. भाज्या पिकवायला सुरुवात झाली. भाज्या इतक्या रसरशीत असायच्या की त्याकडे बघूनही समाधान मिळायचे. बाबांच्या मते शेतीतले हे भरघोस उत्पादन हे पराक्रमाचे व पुरुषार्थाचे प्रतीक होते.
आनंदवनातील ४६५ एकर जमिनीपैकी २६५ एकर जमीन शेतीखाली आली. याशिवाय शेतीला पूरक असे काही व्यवसाय केले जाऊ लागले. उदाहरणार्थ, गो-पालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, रेशीमकिडा पालन.
परदेशातील अनेक लोक आवर्जून आनंदवन पाहायला येऊ लागले. एकदा स्वित्झर्लंडचे राजदूत आनंदवनात आले होते. त्यांनी बाबांना कडकडून मिठी मारली आणि ते म्हणाले, “या आनंदवनात तुम्ही महारोगाला मारून टाकले आहे.” यावर बाबा म्हणाले, “जिथे भीती, तिथे प्रीती नसते. अंत:करणातून भीतीला हाकलून दिल्याखेरीज मानवावर प्रीती करता येत नाही.”
संधिनिकेतन
आर्थर टार्नोव्हस्की हे पोलिओ पीडित पोलिश गृहस्थ. ते इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले. त्यांना चाकाच्या खुर्चीवरून सगळीकडे फिरावे लागे. शारीरिकदृष्ट्या अपंगांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात हे पाहण्यासाठी ‘रीडर्स डायजेस्ट ग्रुप’ तर्फे त्यांनी जगभर प्रवास केला. ते आनंदवनात आले आणि बाबांचे मित्र होऊन गेले. १९६६ च्या आसपास अपंग व्यक्तींच्या समस्यांचा अभ्यास सुरू झाला आणि त्यातून ‘संधिनिकेतन’ची कल्पना साकार झाली. रीडर्स डायजेस्ट ग्रुपने यासाठी दीड लाख रुपये दिले आणि संधिनिकेतनची इमारत उभी राहिली. अंध, अपंग, मूकबधिर, कुष्ठमुक्त लोकांना अर्थार्जनासाठी एखादे कौशल्य प्राप्त करण्याची, व्यवसाय शिकण्याची सोय इथे केली गेली. सुतारकाम, लोहारकाम, शिवणकाम, प्रिंटिंग, गालिचे व सतरंज्या बनवणे, वेतकाम, सूतकताई, विणकाम, वेल्डिंग करणे, चामड्याच्या वस्तू बनवणे अशी अनेक कौशल्ये इथे शिकवली जाऊ लागली.
प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे व क्षमतेप्रमाणे एखादे कौशल्य आत्मसात करून पैसे मिळवावेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा संधिनिकेतनचा हेतू झाला.
डेअरी उद्योग
१९५१ मध्ये विनोबाजींनी बाबांना गाय विकत घेण्यासाठी पैसे दिले होते. त्यावेळी साधनाताईंची प्रकृती अगदी खालावलेली होती, ती सुधारावी म्हणून गायीचे दूध आवश्यक होते. बाबांनी एक लंगडी गाय विकत घेतली आणि आनंदवनात दुग्ध उत्पादन सुरू झाले, असे म्हणता येईल. पुढे काही वर्षांनी बाबांनी आणखी काही गायी विकत घेतल्या. गायीचे दूध गावात विकून आनंदवनासाठी पैसा मिळवावा, हा बाबांचा एक हेतू होता. दुसरा हेतू, दूध विकण्याच्या व्यवसायामुळे समाज व आनंदवन यांच्यात संबंध प्रस्थापित होतील.
गावातल्या लोकांनी प्रथम काही दिवस दूध विकत घेतले. पण नंतर ते आनंदवनातून येते म्हटल्यावर दूध विक्री होईनाशी झाली. लोकांना वाटत होते की दूध काढण्याचे काम कुष्ठरोगी करतात, त्यामुळे आपल्यालाही कुष्ठरोग होईल. शेवटी साधनाताईंनी दूध काढायची जबाबदारी स्वीकारली. गावातील लोकांनी आनंदवनात येऊन साधनाताईच दूध काढतात ही खात्री करून घेतली. पुढे गजानन वसु या कार्यकर्त्याने डेअरी व्यवसाय वाढवला. वर्गीस कुरियन यांच्या पुस्तकानुसार डॉ. विकास यांनी गायींची काळजी घेतली आणि पुढे डेअरी व्यवसाय आणखी वाढला. डेअरीमुळे आनंदवनात दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. त्याशिवाय दुधाची विक्री करून आनंदवनाला पैसेही मिळू लागले. महत्त्वाचे म्हणजे कोणतीही मशिनरी न वापरता डेअरी व्यवस्थित चालू शकते, हे लोकांना समजले.