बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
२४ डिसेंबर १९८५ रोजी बाबांनी ‘भारत जोडो’ यात्रेची सुरुवात केली. यात चौदा राज्यांतून ५००० किलोमीटरचा प्रवास करून शंभर युवक कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत गेले. बाबांनी सोमनाथ येथील ‘श्रमसंस्कार शिबिरा’त ‘भारत जोडो अभियाना’चा संकल्प जाहीर केला होता. बाबा कुठलाही प्रकल्प सुरू करीत, त्यामागे त्यांचे सखोल चिंतन असे. हे उपक्रम अचानक सुरू केलेले नसत. बाबा कितीतरी दिवस त्या गोष्टीवर चिंतन करीत होते व मग हे अभियान सुरू झाले.
‘श्रमाश्रम’ कल्पनेतून पुढे आनंदवन, श्रमिक विद्यापीठ हे प्रकल्प पुढे आले. १९४२ ला महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ हा नारा दिला. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण देशाच्या विविध भागांतील फुटीरतेला अनेक चळवळी खतपाणी घालत होत्या. बाबा म्हणत, ‘१९४२ ची चळवळ त्यामानाने सोपी होती, कारण आपला शत्रू ब्रिटिश आपल्यासमोर होता. परंतु राष्ट्रीय एकात्मतेची चळवळ त्यापेक्षा फार गुंतागुंतीची आहे, कारण आपला शत्रू अदृश्य आहे. तो तुमच्या-आमच्यातच दडलेला आहे.’
देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण भारतीय एकात्मतेला तडा जाण्याची वेळ आली होती. ईशान्येकडील राज्यांना भारतापासून वेगळे व्हायचे होते. पंजाबात ‘खलिस्तान’ चळवळीने जोर धरला होता. त्यांना शिखांचे वेगळे राष्ट्र हवे होते. ३ जून १९८४ रोजी भारतीय लष्कराने शिखांना प्रतिकार करण्यासाठी त्यांच्या पवित्र धर्मस्थळात, अमृतसरमधील सुवर्णमंदिरात प्रवेश केला. या कारवाईला ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ असे नाव दिले होते. सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी कारवाई केली गेली, पण त्यामुळे पुढे इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर देशभरात दंगल उसळली. खून, मारामाऱ्या, बॉम्बस्फोट यांचे सत्र सुरू झाले. एकंदरीत संपूर्ण देशभर अस्वस्थता दिसून येत होती. यातून बाबांच्या मनात ‘भारत जोडो अभियान’ पक्के झाले. शिवाय १९८५ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने ‘युवा वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यामुळे बाबांच्या विचारांना बळकटी मिळाली आणि त्यातूनच बाबांची इच्छा मूर्त स्वरूपात साकार झाली.
२४ डिसेंबर १९८५ रोजी साने गुरुजींच्या जन्मदिनी हे अभियान सुरू झाले. कन्याकुमारी येथून सुरू होऊन १०७ दिवसांचा, १४ राज्यांचा, ५०४२ किलोमीटर अंतराचा, रोज ५० ते ६० किलोमीटर प्रवास करून काश्मीरमधील जम्मू येथे १० एप्रिल रोजी अभियान समाप्त करायचे, असे ठरले.
भारत जोडो अभियानाच्या वेळी बाबा म्हणाले, “जमिनीवर कोणतेही बी पडले तरी ते लगेच रुजते, मूळ धरते; पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ३६ वर्षांनीसुद्धा आपल्या हृदयात राष्ट्रीय एकात्मतेचे बीज रुजू शकलेले नाही.”
या अभियानाचे दोन प्रमुख उद्देश होते.
१) राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावणे.
२) देशातील युवाशक्ती संघटित करून राष्ट्रनिर्माण कार्यासाठी तरुणांना रचनात्मक कार्यात गुंतवणे.
भारतभर हिंडून आपल्या देशातील विविधता पाहावी, पण त्याचबरोबर देशामध्ये असणारी आर्थिक व सामाजिक विषमता जाणून घ्यावी. अर्थात विविधतेच्या मुळाशी एकतेचा अनुभव युवकांना घेऊ द्यावा, हा विचार या अभियानामागे होता. बाबांना संपूर्ण भारतात सलोखा निर्माण करायचा होता. शांती, प्रेम, समता, बंधुभाव यांचा प्रचार करणे, पर्यावरण व मानवी हक्क याबद्दल जनजागृती करणे, असे काही विचार बाबांच्या मनात होते. त्याकाळी संपूर्ण भारतात जी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे बाबा अत्यंत अस्वस्थ झाले होते. आपण काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. कुठल्याही पक्षाचा आधार न घेता देशातील तरुणांना एकत्र आणून देशभर शांतीचा संदेश घेऊन जाणे, हाच त्यांचा उद्देश होता.
बाबा म्हणत, “जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मांधतेने जर्जर झालेल्या पिढीला वाचविण्यासाठी मी ‘भारत जोडो अभियान’ हाती घेतले आहे. आपल्याला जर देश एकसंध ठेवायचा असेल, तर लोकांची मने सांधली गेली पाहिजेत.”
या यात्रेची आखणी अगदी तपशीलवार केलेली होती. यात्रेचा दैनंदिन कार्यक्रम, रोज किती अंतर जायचे, खाण्यापिण्याची व्यवस्था, रात्रीच्या मुक्कामाची ठिकाणे, दिवसभरात थोडा वेळ विश्रांती घेण्याची ठिकाणे, यात्रेचा खर्च, वैद्यकीय व्यवस्था अशा सर्व गोष्टींचे नियोजन केलेले होते. २४ डिसेंबर रोजी यात्रा सुरू करण्यात आली, कारण हा साने गुरुजींचा जन्मदिवस व याच दिवशी स्वामी विवेकानंदांना साक्षात्कार झाला होता. येशू ख्रिस्ताच्या जन्माची ही पूर्वसंध्या असल्याने हाच दिवस यात्रेची सुरुवात करण्यासाठी ठरवण्यात आला.
श्री यदुनाथ थत्ते या यात्रेचे संयोजक होते. पुण्याचे कर्नल रेगे यांनी यात्रेची रचना अशी केली होती की संपूर्ण यात्रेत बाबा सहभागी होते. यात्रेचा मार्गही असा निवडला होता की तरुणांना देशातील विषमता, दारिद्र्य, पर्यावरणाची होणारी हानी, पाणीटंचाई या सर्व समस्यांची जाणीव व्हावी. यात्रेत सहभागी होणाऱ्यांचे वय २१ ते ३५ च्या दरम्यान असावे. त्यांना रोज ५० ते १०० किलोमीटर सायकल चालवायची सवय असावी आणि त्यांनी पूर्णवेळ यात्रेत सहभागी व्हायला हवे, अशा अटी तरुणांना घातल्या होत्या. निरनिराळ्या राज्यांतील, निरनिराळ्या भाषा बोलणारे शेकडो तरुण या यात्रेत सहभागी होण्यासाठी जमा झाले. त्यांतले फक्त १२५ जण निवडले गेले. यात १४ युवती सामील होत्या. यातले काही विद्यार्थी होते, तर काही शेतकरी, वकील, इंजिनीयर, डॉ. अशा विविध क्षेत्रांतील तरुण होते.
रोजच्या कार्यक्रमात वृक्षारोपण, राष्ट्रीय एकता, स्त्रीमुक्ती व समानता, आरोग्य, विषमता निर्मूलन, जनसंख्या, पथनाट्य, कथाकथन, प्रदर्शन असे विविध कार्यक्रम होत असत. रोजचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होई. या अभियानातून युवकांना बरीच ज्ञानप्राप्ती झाली, त्यांचे प्रबोधन झाले.
यात्रेदरम्यान अनेक नारे दिले जायचे. उदाहरणार्थ,
आओ सब मिलकर बोलो | भारत जोडो भारत जोडो | जातीपाती की बात छोडो | भारत जोडो भारत जोडो |
बाबांना या काळात बसता येत नव्हते. ते ॲम्बुलन्समध्ये आडवे झोपून यात्रेत सहभागी झाले होते. सुप्रसिद्ध माहितीपट निर्माते सिद्धार्थ काक आणि त्यांची टीम या यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी बाबांनी सिद्धार्थ काक यांना एक आठवण सांगितली. १९७३ मध्ये बाबा आणि जयप्रकाश नारायण एकाच हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते, तेव्हाच या अभियानाबद्दल चर्चा झाली होती. जयप्रकाशजी बाबांना म्हणाले होते, ‘तुम्ही थकले आहात. तुमची प्रकृती ढासळत आहे. तरुणाईच्या शक्तीशिवाय तुम्ही कसे काय पुढे जाणार?’
सिद्धार्थ काक यांनी या अभियानावरचा माहितीपट अत्यंत विचारपूर्वक बनवला आहे. यात सायकलस्वारांच्या मुलाखती, त्यांचा यात्रेदरम्यानचा प्रवास, त्यांना आलेले अनुभव, निसर्गाचे चित्रण, रस्त्यातून जाताना गावातील झेंडे घेऊन स्वागत करणारी मुले, आपली परंपरागत वेशभूषा करून नृत्य करणारे आदिवासी, ढोल वाजवणारे आदिवासी, यांची चित्रे दिसून येतात.
या अभियानात एका वडाच्या झाडाखाली थांबून बाबा म्हणाले, ‘वडाच्या पारंब्या जशा सर्वदूर पसरतात, त्याप्रमाणे भारत जोडो आपला संदेश साऱ्या देशभर पसरवणार आहे. वृक्ष हे सहवेदनेचे, करूणेचे प्रतीक आहे. वृक्ष कधी आपल्या वागण्याचे समर्थन करीत नाही. दुसऱ्याविषयी मत बनवत नाही. तो अनामिक वृक्ष माझ्या कानात हितगुज करतो. त्याची भित्री पाने वाऱ्याला धिटाईने प्रश्न विचारतात, वादळाशी संवाद साधतात, आभाळात किती आरामात असतात ती! वृक्षांच्या पानांकडूनही आपण खूप काही शिकू शकतो. या अभियानात आपण वृक्षारोपण करू, कारण वृक्ष हा अंधार आणि प्रकाश यांना बांधणारा सेतू असतो. वृक्षाचा बुंधा हा माझ्या दृष्टीने विजयस्तंभासारखा असतो. त्याच्यावर लहरणारी पर्णराजी मला राष्ट्रध्वजासमान भासते. त्याच्या फांद्यांवर विसावलेले विविध जातींचे पक्षी मला प्रेमदूतासारखे भासतात. श्रद्धा, साहस आणि धैर्याचे ते प्रेषित असतात.’
यात्रेदरम्यान हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करायचा होता. परंतु बाबांनी युवतींना या अभियानात सामील करून घेतले, हा त्यांचा धाडसी निर्णय होता. अनेक जण त्यांच्या या निर्णयाच्या विरुद्ध होते, पण बाबांनी आपले म्हणणे सोडले नाही आणि या युवतींनीदेखील बाबांचा विश्वास सार्थ ठरवत अभियान पूर्ण केले. एक-दोघींनी त्यांचे पंजाबमधले अनुभव वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले. डॉ. मनीषा लोढा ही युवती तिचा अनुभव सांगते, “मला आंध्र प्रदेशातून प्रवास करताना एका बाईचे बाळंतपण करावे लागले. माझ्याकडे कोणतीही साधने नव्हती. निर्जंतुक केलेले हातमोजेसुद्धा नव्हते, पण मी माझ्या काही स्त्री सहकाऱ्यांना मदतीला घेऊन तिचे बाळंतपण केले.”
विविध राजकीय पक्षांच्या लोकांनी बाबांच्या या अभियानाला पाठिंबा दिला. मधु दंडवते आपल्या भाषणात म्हणतात, “गांधीजींनी नौखालीमध्ये जे काम करून दाखवले, ते काम बाबांना संपूर्ण देशात करायचे आहे. पंजाबात करायचे आहे.”
एल. के. अडवाणी म्हणतात, “स्वातंत्र्याला चाळीस वर्षे झाल्यानंतर बाबा आमटेंनी भारत जोडो अभियान सुरू केले, त्यामुळे आपल्या देशाच्या भवितव्याला असलेल्या संभाव्य धोक्याची जाणीव आपल्याला होऊ लागली आहे.”
आर. के. गुजराल म्हणतात, “आज आमचा देश आमच्या डोळ्यांसमोर कोसळून पडत आहे. त्याबद्दल काय करायचे, हेच आम्हाला समजत नाही. आम्ही कोणाला आवाहन करायचे? हिंदूंना? शिखांना? सरकारला? आम्हाला समजत नाहीये. जिकडे बघावे तिकडे अंधाराचे साम्राज्य आहे. या अंधकारात बाबा, तुम्ही आमच्या समोर एक मशाल पेटवली आहे, आमच्या पुढचा अंधकार नाहीसा करण्यासाठी!”
अभियानाच्या दरम्यान बाबा प्रत्येक गावात भाषण करत. लोकांशी संवाद साधत. दिल्लीत जी शिखांची निर्वासित छावणी होती, तेथेही बाबा शीख बांधवांसमोर तळमळीने बोलले.
शेवटी ही यात्रा पंजाबमध्ये पोहोचली. पंजाब अस्वस्थ होता. सगळीकडे हिंसाचार माजला होता. कुठे जमावबंदीचा आदेश होता, तर कुठे बंद पाळला जात होता. लोक पंजाबात प्रवेश करायला घाबरत असताना भारत जोडो अभियानाचे कार्यकर्ते मात्र निर्भयपणे पंजाबमधील शहरे, खेडी पार करीत पुढे निघाले होते. पंजाबमध्ये प्रत्येक गुरुद्वारात बाबांचे स्वागत झाले. शिखांनी तर बाबांना ‘संत बाबा’ केले होते. बाबांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या शीख लोकांनी घेतली होती.
पंजाबच्या एका विद्यापीठात बाबांचे व्याख्यान ठेवले होते. त्यावेळी एक तरुण खलिस्तानी व्यासपीठावर आला आणि त्याने बाबांना धमकावून म्हटले, “पंजाबमध्ये स्त्रियांवर अत्याचार होत असताना तुम्ही कुठे होतात?” असे म्हणून त्याने बाबांवर तलवार रोखली. बाबा तेव्हा बिछान्यावर आडवे होते. ते त्या तरुणाला म्हणाले, “हा तरुण तलवार हातात घेऊन बोलला. स्त्रियांवर झालेल्या अत्याचारामुळे हा पेटून उठला आहे, हे पाहून माझ्या मनात आशा जागृत झाली आहे. असे तरुण भारतात आहेत, हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.” हे ऐकताच त्या मुलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला अशा प्रकारची प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती.
तरुणाई म्हणजे काय, हे सांगताना बाबा म्हणतात, ‘केवळ तरुणांच्या शक्तीनेच या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकेल. पण तरुण नक्की कोण? जो वादळी वाऱ्यावर आरूढ होतो आणि वावटळीला योग्य दिशा दाखवतो, तोच खरा तरुण. जो कोणत्याही परिस्थितीत ‘नाही’ या शब्दाचा उच्चार कधीच करत नाही, नेहमी होकार देतो, तो खरा तरुण. कोणत्याही प्रकारची आणीबाणी ओढवली, संकटे समोर उभी ठाकली, कोणतीही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, तरी त्याची हाताळणी करण्यास जो सदैव सिद्ध असतो — ज्याचे आयुष्य साहसांनी भरलेले असते — ज्याच्या देहाच्या छिद्रांमधून धर्मबिंदू वाहत नाहीत, पण दुर्दशा पाहून अश्रू वाहू लागतात, तोच खरा तरुण. जे मुके आहेत, त्यांचा आवाज आजच्या तरुणाईने बनायला हवे.’
त्यावेळी पंजाबच्या पोलीस खात्याचे डायरेक्टर जनरल जे. एफ. रिबेरो होते. त्यांच्या मते बाबांसारखी अनेक माणसे निर्माण झाली तर जगात काहीच समस्या राहणार नाहीत. पण दुर्दैवाने अशा व्यक्ती अभावानेच आढळतात, म्हणून तर लोक त्यांच्यावर नितांत प्रेम करतात. त्यांची पूजा करतात.
हे अभियान कार्यकर्त्यांना खूप काही शिकवून गेले. प्रत्येकाच्या मनात ‘समाजासाठी काहीतरी केले पाहिजे,’ ही जाणीव तीव्रपणे जागृत झाली. बाबांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा दुर्दम्य उत्साह यांचा तरुणांवर मोठा प्रभाव पडला. बाबा स्वतः शिस्तीने वागत आणि त्यामुळे इतरांनाही या शिस्तीची सवय लागली. बाबांना पाठीच्या मणक्याचा विकार होता. इतर शारीरिक व्याधी होत्या, पण त्यांनी आपल्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला न जुमानता ही खडतर यात्रा पूर्ण केली. १९८६ च्या एप्रिल महिन्यात बाबा पहिल्या भारत जोडो अभियानाहून परत आले आणि त्यांनी लगेचच १ जुलै १९८६ रोजी ‘पंजाब शांतता यात्रे’ला सुरुवात केली. बाबांचे मानसिक सामर्थ्य प्रचंड होते, म्हणूनच अनेक शारीरिक व्याधी असूनसुद्धा ते अशा प्रकारचे अभियान पेलू शकत होते.