बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
बाबांवर महात्मा गांधींचा खूप मोठा प्रभाव होता. सुरुवातीला आनंदवनात प्रार्थना होत असे. सूतकताई होत असे. आनंदवनातील राहणी अत्यंत साधी होती. तिथे जाती, धर्म असे भेद मानले जात नव्हते. सर्वत्र खेळीमेळीचे, उत्साहाचे, सकारात्मक वातावरण असे. परंतु याचबरोबर तिथे एक प्रकारची शिस्त होती. अर्थात तिथे कोणाची भीती किंवा दडपण नव्हते. सर्व लोक बाबांचा आदर करीत. त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेमही करीत. सर्व प्रकारच्या विचारसरणीच्या लोकांना बाबा ‘आपले’ वाटत. बाबांनी स्वतः कधीही गांधीजींचा उल्लेख फार ठिकाणी केला नाही. ते गांधींना मानत असत, पण ते पूर्णपणे गांधींच्या विचारसरणीने वागत नसत. आनंदवनात कायम नावाप्रमाणेच आनंद भरलेला असे, हेच आनंदवनाचे वैशिष्ट्य. खरेतर आनंदवन कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर लोकांसाठी निर्माण केलेली संस्था. पण तिथे कुठल्याही प्रकारचे नकारात्मक वातावरण नव्हते. प्रत्येक माणूस उत्साहाचा एक झराच आहे असे वाटे.
सोमनाथ प्रकल्प
१९६७ साली बाबांनी आनंदवनापासून साठ मैल पूर्वेस असलेल्या सोमनाथ इथे अंदाजे १९२४ एकर घनदाट जंगल जमीन घेऊन ‘सोमनाथ प्रकल्प’ सुरू केला. येथे श्रमसंस्कार शिबिरे आयोजित केली जाऊ लागली .
बाबा एक प्रकल्प सुरू झाला की लगेच दुसऱ्या प्रकल्पाचा विचार करीत. एक गोष्ट करून स्वस्थ बसणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. आनंदवनात नव्या शिक्षण उपक्रमांची गडबड चालू असतानाच १९६७ मध्ये बाबांना चंद्रपूर जिल्ह्यात ‘मुल’ गावाजवळ नवीन प्रयोग करण्यासाठी जागा मिळाली. तेथे एक प्राचीन असे शंकराचे मंदिर होते. त्याचे नाव सोमनाथ मंदिर, म्हणून या प्रकल्पाचे नाव ‘सोमनाथ प्रकल्प’ असे पडले. इथे त्यांना ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ म्हणजे ‘श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ’ सुरू करायचे होते.
बाबांना आपल्या प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये एक त्रुटी जाणवत असे. विद्यापीठातून जो पदवीधर पदवी घेऊन बाहेर पडतो त्याच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान असते. म्हणजे त्याचे डोके तयार झालेले असते, पण त्याचे हात कार्यक्षम नसतात. या उलट जे विद्यार्थी तंत्र शाळांमधून बाहेर पडतात त्यांचे हात तयार झालेले असतात पण त्यांना त्या विषयाचे पुस्तकी ज्ञान नसते. यामुळे दोघेही जण आपले काम नीटपणे करू शकत नाहीत. ही गोष्ट बदलली पाहिजे, बुद्धी आणि श्रम यांचा मेळ घातला पाहिजे असे बाबांना वाटे. आनंदवनामध्ये असा मेळ घातला जात होता. पण देशाच्या उत्कर्षासाठी काहीतरी केले पाहिजे या हेतूने श्रमिक विद्यापीठाची स्थापना करावी असे बाबांना वाटले. याचा उपयोग विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या युवकांना होणार होता. या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे युवक आपल्या ज्ञानाचा उपयोग करून रोजच्या जीवनातील समस्या सोडवू शकतील. ते समाजात परिवर्तन घडवून आणतील असे बाबांना वाटत असे. श्रमाश्रम, आनंदवन, मुक्तीसदन या सर्व प्रयोगांतून शेवटी तयार झाले ‘श्रमिक विद्यापीठ’. या सर्व प्रकल्पांचे ध्येय किंवा उद्दिष्ट एकच. ते म्हणजे बुद्धी आणि श्रम यांची योग्य ती सांगड घालून समाजाला उपयोगी पडणारे कार्य करणे.
बाबा म्हणत, ‘निसर्गात श्रमतत्त्वाचे अनेक आविष्कार आहेत. चिखलातून वर येणारे कमळ, घरटे बांधणारे पक्षी, एका रांगेत चालणाऱ्या मुंग्या, प्रत्येक फुलावर बसून मध गोळा करणारी मधमाशी, मातीच्या कणांपासून उत्तम खत बनवणारे गांडूळ, हे निसर्गचक्रातील आविष्कार आहेत. निसर्गाला शोषण मंजूर नाही. निसर्ग आपल्या घटकांमध्ये समतोल राखतो. जगा आणि जगू द्या, हे निसर्गाचे तत्त्व आहे.’
सोमनाथ इथे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि बेरोजगार तरुणांना बरोबर घेऊन काही काम करावे असे बाबांच्या मनात होते. पण शेतकऱ्यांना वाटायला लागले की ‘या प्रकल्पामुळे आपल्या उपजीविकेचे साधन; जंगल नष्ट होईल,’ म्हणून त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला. दुसरा मुद्दा असा होता की तिथे बाराही महिने वाहणारा उमरी झरा होता. सोमनाथ प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी या झऱ्यावर एक कच्चा बांध बांधला. त्यामुळे जे लोक या प्रकल्पाच्या विरोधात होते ते म्हणू लागले की या बांधामुळे झऱ्याशेजारील शेतांना पाणी मिळत नाही. शेवटी या झऱ्याचे पाणी शेतकऱ्यांना देण्याचे ठरले. तरीही वाद मिटत नव्हता. याशिवाय अजून एक कारण म्हणजे कुष्ठरोग्यांबद्दल लोकांच्या मनात भीती होती. त्यामुळेही विरोध होता. काही सर्वोदय नेते या शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते, म्हणून काही दिवस ताणतणावाचे गेले. शेवटी विनोबाजींनी मध्यस्थी केली. काही एकर जमीन शेतकऱ्यांना दिली आणि बाबांच्या हातात फक्त १२१९ एकर जमीन आली. या सर्व घटनांमुळे बाबांचे श्रमिक विद्यापीठावरून मन उडाले आणि इथे फक्त ‘श्रमसंस्कार छावणी’ सुरू झाली.
सोमनाथच्या जंगलात घनदाट झाडी होती. हिंस्त्र पशु होते. पण निधड्या छातीचे बाबा व त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते मागे हटले नाहीत. प्रथम बाबा व साधनाताई जिथे वाघ येण्याची शक्यता जास्त असते तिथेच उघड्यावर झोपत असत. पुढे त्यांनी आपली झोपडी सुद्धा अशाच ठिकाणी बांधली.
हळूहळू कार्यकर्त्यांच्या मदतीने जमीन सपाट होऊ लागली. झोपड्या उभ्या राहू लागल्या. बाबांच्या शब्दात सांगायचे झाले तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या घामाचा सडा जमिनीवर पाडला आणि त्याचे फळ हळूहळू दिसू लागले. शेती बहरू लागली. जेव्हा बाबा सोमनाथला राहत होते तेव्हा आनंदवनाचा कारभार साधनाताईंच्या हातात होता. थोडक्यात दोन्ही पती-पत्नी कार्यरत होते, म्हणून समाजाचा विकास होत होता.
बाबांच्या मनात फार मोठी आशा होती की सोमनाथला ‘श्रमिक विद्यापीठ’ सुरू होईल. या नावाच्या संस्था रशिया, युगोस्लाव्हिया इत्यादी देशात सुरू होत्या. श्रमिक विद्यापीठामध्ये विज्ञान आणि भारतीय संस्कृती यांचा समन्वय साधण्याची योजना होती. ‘अर्निंग थ्रू लर्निंग’ या तत्त्वावर युवकांना शिक्षण देता येईल. विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनावर हे विद्यापीठ चालू राहील. ‘श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ’ या पुस्तिकेतील विचार १९६४ मध्ये ‘साधना’ साप्ताहिकाने बाबांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या विशेषांकात मुलाखतीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले होते. या मुलाखतीत गांधीजींच्या ‘हिंदू स्वराज्य’ या छोट्या पुस्तकाचे प्रतिबिंब दिसून येते. बाबांचे विद्यापीठ सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, पण बाबांनी तिथे सुरू केलेल्या ‘श्रमसंस्कार शिबिरांमुळे देशातील दिशाहीन सैरभैर झालेल्या युवकांसाठी सोमनाथ आदर्श ठिकाण बनले.
आपल्या बुद्धिमत्तेचा व शारीरिक क्षमतांचा वापर करून ग्रामीण भारताची उत्पादन क्षमता वाढविणारी, खेड्यांचा विकास करणारी ग्रामीण युवा पिढी असावी, असे बाबांना वाटत होते. देशातील तरुणांना श्रमाचे महत्त्व समजले पाहिजे, यासाठी सोमनाथला दरवर्षी श्रमसंस्कार शिबिरे भरविण्याचे ठरले. नव्या पिढीवर बाबांची अफाट श्रद्धा होती. नवी पिढीच समाजामध्ये परिवर्तन घडवू शकेल याची त्यांना खात्री होती.
१९६७ साली पहिले श्रमसंस्कार शिबिर भरले. भारताच्या विविध भागातून तरुण युवक आणि युवती तिथे जमा झाले. मे महिन्याचे दिवस होते. पण सर्व तरुणांनी पाझर तलाव खणणे, जमीन सपाट करणे, लहान लहान धरणे बांधणे, शेताला बांध घालणे अशी कामे भर उन्हात केली. पहाटेपासून हे काम सुरू होई ते उन्हाचे चटके लागेपर्यंत चालत असे. दुपारी विविध विषयांवर चर्चा, तज्ज्ञ लोकांची व्याख्याने असत. तर रात्री करमणुकीचे कार्यक्रम चालत. बाबांची व्याख्याने तरुणांना कार्यप्रवण करणारी व स्फूर्ती देणारी असत. बाबांची व्याख्याने हे शिबिरांचे वैशिष्ट्य असे.
या शिबिरांंतून कितीतरी नवीन कार्यकर्ते बाबांना मिळाले. डॉ. अनिल अवचट, डॉ. रविंद्र कोल्हे, डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. गिरीश कुलकर्णी, अरुण कदम, दादा पांचाळ, डॉ. कुमार सप्तर्षी, कुमार शिराळकर, डॉ. रुपा कुलकर्णी, मोहन टंडन असे कितीतरी कार्यकर्ते या शिबिरांतून तयार झाले. ‘भारत जोडो अभियान’ ही कल्पना या शिबिरांतील चर्चेचे फलित आहे.
एका व्याख्यानात बाबा म्हणाले, “रचनात्मक संघर्षासाठी तरुणाईने तयारी करायला हवी. जेव्हा वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर जातात, रुजतात, पसरतात तेव्हा त्यांच्या फांद्या धरतीवर विस्तारतात. रचनात्मक कार्याचा अर्थ भूमीत रुजून मुळे खोलवर पसरवून, जीवनरस प्राप्त करणे. या मुळांची भूमीत विस्तारण्याची शक्ती जेवढी, तेवढा वृक्ष मोठा होतो, बहरतो, पसरतो. कित्येक घोटीव दगडांच्या चिऱ्यातून त्या पत्थरांचे स्नायू चिरीत तो अंकुर पसरतो. ही मुळे केसाहूनही नाजूक, तंतूसमान मुलायम असतात. पण किती दुरून, किती गहराईतून ती जीवनरस शोषून आणतात, वृक्षाला पुरवतात. ही ताकद आपण समजावून घेतली पाहिजे. ही ताकद ज्यावेळी तुम्ही जाणून घ्याल त्यावेळी साहसाला आलिंगन देता येईल. रचनात्मक क्रांती ज्यांना करायची आहे त्यांनी हा बीजमंत्र बाणवला पाहिजे.”
सोमनाथमध्ये अनेक पिके घेतली जाऊ लागली. भाजीपाला पिकू लागला. याशिवाय बेरोजगार मुलांसाठी ‘युवा ग्राम’ चालू झाले. सेवाग्राममध्ये दहावी बारावी नापास झालेल्या मुलांना निरनिराळ्या कामांमध्ये सामावून घेतले जाऊ लागले. कोणी शेती काम करत, तर कोणी इलेक्ट्रिशियनचे. हे तरुण त्यांना आवडेल तो व्यवसाय शिकत व मग तो व्यवसाय चालू ठेवत.
सोमनाथ प्रकल्पाच्या वेळेला बाबांचे पाठीचे दुखणे विकोपाला गेले होते. खरेतर त्यांनी आत्तापर्यंत अनेक दुखणी झेलली होती. दोन हार्ट अटॅक, पेस मेकर बसवण्याची शस्त्रक्रिया, पाठीच्या मणक्याचे दुखणे या सर्वांमुळे ते अंथरुणाला खिळले होते, पण अशा परिस्थितीतही त्यांचा उत्साह व जिद्द तशीच होती.
पुण्याच्या एस.पी. कॉलेजमधल्या प्रोफेसर परांजपे बाई एक अनुभव सांगतात. त्या म्हणतात, ‘मी माझ्या विद्यार्थ्यांना सोमनाथ प्रकल्प दाखवायला घेऊन गेले. परत येताना सोमनाथपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले ‘मुल’ या गावी आम्हाला पुण्याला जायला बस मिळणार होती. बाबांनी त्यांच्यासाठी असलेली खास बस आम्हाला दिली होती. आम्ही सकाळी लवकर निघालो म्हणून बाबांची आणि आमची भेट झाली नाही. ‘मुल’ला पोहोचल्यावर मी बाबांना फोन केला तर एका माणसाने फोन उचलला व सांगितले तुम्हाला भेटायला बाबा येत आहेत. तुम्ही थांबा. जाऊ नका. आम्हाला कळेना बाबा कसे येणार? त्यांची बस तर आम्ही आणली होती. इतक्यात दुरून एक टेम्पो आमच्या दिशेने येताना दिसला. त्या ट्रकच्या बाहेरच्या बाजूला एक पायरी होती व त्या पायरीवर बाबा तोल सांभाळीत उभे होते. त्यांना बसता येत नसे. माझे विद्यार्थी वीस एकवीस वर्षाचे. त्यांना अश्रू अनावर झाले. आमचा निरोप घेण्यासाठी बाबा स्वतः धोका पत्करून आले होते,” काय म्हणावे या जिद्दीला!
बाबांनी सोमनाथमध्ये काम करण्यासाठी योग्य त्या लोकांची निवड केली होती. त्यांना लोकांच्या क्षमता ओळखता येत असत. कोण काय व किती काम करू शकेल याचा त्यांना बरोबर अंदाज येत असे आणि त्यानुसार ते आपल्या सहकाऱ्यांना काम देत असत. काम दिल्यावर ते त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास टाकीत. एखादी चूक सहकार्याकडून झालीच तर बाबा त्याला माफ करीत. या त्यांच्या गुणामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्ते त्यांनी आपलेसे केले होते.
बाबांच्या व्यक्तिमत्त्वातच अशी जादू होती की लोक त्यांच्याभोवती गोळा होत. त्यांच्या एका शब्दासाठी काम करीत.