बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
१९१४: २६ डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका सधन ‘मालगुजार’ कुटुंबात जन्म.
१९३४: नागपूर येथून आर्ट्स कॉलेजमधून बी.ए.ची पदवी प्राप्त केली.
१९३६: कायद्याची पदवी मिळवून वकिली व्यवसायास सुरुवात केली. याच सुमारास महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात राहण्यासाठी गेले.
१९४२: महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवास भोगला.
१९४६: १८ डिसेंबर रोजी इंदू घुले (साधनाताई आमटे) यांच्याशी विवाहबद्ध झाले.
१९४८: रस्त्याच्या कडेला गटारात पडलेला एक अत्यंत उपेक्षित कुष्ठरोगी पाहिला. या घटनेनंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
१९४९: कुष्ठपीडितांवर औषधोपचार आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी ‘महारोगी सेवा समिती’ची स्थापना केली.
१९५१: कलकत्ता येथील ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’मधून कुष्ठरोगाचे प्रशिक्षण पूर्ण करून परतले. मध्य प्रदेश सरकारकडून मिळालेल्या ५० एकर पडीक जमिनीवर आनंदवनाची उभारणी सुरू केली.
१९५२: २१ जून रोजी विनोबा भावे यांच्या हस्ते ‘आनंदवन’ वसाहतीचे अधिकृत उद्घाटन झाले.
१९५६: आनंदवनात गायी आणून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. तसेच नागपूरजवळ ‘अशोकवन’ ही कुष्ठरोग्यांची दुसरी वस्ती स्थापन केली.
१९५७: आनंदवनात वीज आली आणि पहिली प्राथमिक शाळा उघडली गेली. आजूबाजूच्या ३० मैल परिसरात उपचारांसाठी ११ केंद्रे सुरू केली.
१९६०: अंध मुलांसाठी ‘सनशाईन होम’ आणि रोजगार निर्मितीसाठी ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ सुरू केला.
१९६१: आनंदवनात विविध क्षेत्रातील दिग्गजांना एकत्र आणणारा ‘मित्र मेळावा’ हा उपक्रम सुरू केला.
१९६२: आनंदवनात पोस्ट ऑफिसची सुरुवात झाली. तसेच १७ नोव्हेंबरला संत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते ‘मुक्तीसदन’चे उद्घाटन झाले.
१९६४: बाबांचा ‘ज्वाला आणि फुले’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.
१९६६: अंध, अपंग व मूकबधिरांना व्यवसाय आणि कौशल्ये शिकवण्यासाठी ‘संधिनिकेतन’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ सुरू केले.
१९६७: चंद्रपूर जिल्ह्यात तरुणांना श्रमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘सोमनाथ प्रकल्प’ सुरू केला आणि तिथे पहिले ‘श्रमसंस्कार शिबिर’ आयोजित केले.
१९६८: आनंदवनात विवाहित रुग्णांसाठी ‘सुखसदन’ आणि वृद्धांसाठी ‘स्नेहछाया’ बांधले गेले.
१९७३: २३ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड जंगलात ‘माडिया गोंड’ आदिवासींसाठी ‘लोक बिरादरी प्रकल्प’ (हेमलकसा) सुरू केला.
१९७४: कुष्ठरोग्यांना वापरता येतील अशा चपला बनवण्याची विक्री सुरू झाली. पु. ल. देशपांडे यांच्या देणगीतून 'मुक्तांगण' बांधले गेले. याच वर्षी डॉ. प्रकाश आमटे हेमलकसा येथे रुजू झाले.
१९७६: हेमलकसा येथे आदिवासी मुलांसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली.
१९७८: सांडपाण्याची व्यवस्था आणि इंधनासाठी आनंदवनात पहिला बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला.
१९७९: सेवानिवृत्त लोकांसाठी ‘उत्तरायण’ नावाची संस्था सुरू केली.
१९८४: बाबांचा ‘करुणेचा कलाम’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.
१९८५: तरुणांना राष्ट्रीय एकात्मतेच्या सूत्रात बांधण्यासाठी २४ डिसेंबर रोजी कन्याकुमारी ते जम्मू या ‘भारत जोडो अभियाना’ची सुरुवात केली. याच वर्षी त्यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ मिळाला.
१९८६: भारत सरकारकडून ‘पद्मविभूषण’ पुरस्कार मिळाला. पंजाबमधील खलिस्तान चळवळ आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर १ जुलै रोजी ‘पंजाब शांतता यात्रे’ची (पीस बाय पीस मिशन) सुरुवात केली.
१९८७: १ नोव्हेंबर रोजी ईशान्य भारतासाठी अरुणाचल प्रदेशातील इटानगर ते गुजरातच्या ओखापर्यंत दुसरे ‘भारत जोडो अभियान’ सुरू केले.
१९८८: ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार’ प्राप्त झाला. जुलै महिन्यात ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या प्रश्नावर आनंदवनात पहिली चर्चा घडवून आणली.
१९९०: ‘नर्मदा बचाव आंदोलना’त सक्रिय सहभाग घेत बाबांनी कसरावद येथे मुक्काम ठोकला. २५ डिसेंबरला सरदार सरोवरापर्यंत काढण्यात आलेल्या ‘लॉंग मार्च’चे नेतृत्व केले.
१९९१: नर्मदा आंदोलनातील विस्थापितांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून बाबांनी सरकारला 'पद्मश्री' व 'पद्मभूषण' हे पुरस्कार परत केले. त्यांना संयुक्त राष्ट्रांचा 'डेल ऑफ ऑनर' व स्वीडनचा ‘राईट लाईव्हलीहुड अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
१९९९: भारत सरकारचा सर्वोच्च ‘गांधी शांतता पुरस्कार’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
२००४: महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला.
२००८: २ फेब्रुवारी रोजी आनंदवनात बाबा आमटे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर त्यांचा देह मातीला अर्पण करून (दफन करून) त्यावर एक झाड लावण्यात आले.