बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
काही वेळा माणसाच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडतो ज्यामुळे त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळते. हा क्षण जो पकडतो तो मनुष्य असामान्य होतो. गौतम बुद्धांनी वृद्ध मनुष्य, रोगी आणि प्रेतयात्रा पाहिली आणि त्यांच्या जीवनाची दिशा बदलली, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे.
श्रमाश्रमाचा प्रयोग झाल्यानंतर बाबा म्युन्सिपालिटीमध्ये सक्रिय होते. ते भंगी कामगारांच्या युनियनचे अध्यक्ष होते. एकदा भंग्यांनी संप पुकारला तेव्हा बाबांनी त्यांच्याशी बोलणी केली. एक भंगी त्यांना म्हणाला, “आम्ही डोक्यावरून रोज मैला वाहून नेण्याचे घाणेरडे काम करतो. तुम्ही करू शकाल का हे काम?” तेव्हापासून पुढे १४ महिने बाबा सकाळी लवकर उठून डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम करीत होते.
असेच ते एक दिवस संडास सफाईचे काम संपवून घरी येत होते. १९४८ सालचा हा प्रसंग. वाटेत बाबांना एक कुष्ठरोगी रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. त्याचे नाक कान झडून गेले होते. अंगावरच्या जखमांत अळ्या झाल्या होत्या. बाबांना ते दृश्य पाहून तिथून पळून जावेसे वाटले, पण ते थांबले. त्यांनी त्या रोग्याच्या अंगावर एक पोते टाकले आणि ते घरी आले. पण त्यांच्या मनात आले, ‘समजा हा रोग उद्या मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणाला झाला तर त्यावेळी माझे कर्तव्य काय असेल?’ या विचाराने पुढे कित्येक दिवस ते अस्वस्थ होते. त्या काळात कुष्ठरोग झालेल्या माणसाला घरातून बाहेर हाकलून देत असत. त्यांना कोणी मदत करीत नसे. समाजही अशा लोकांना वाळीत टाकत असे. हा रोग ‘संसर्गजन्य’ आहे अशी लोकांची समजूत होती, त्यामुळे कुष्ठरोग्यांना समाजात मिसळायची परवानगी नसे. अशा लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेने बाबांच्या मनात उचल खाल्ली आणि त्याच रात्री बाबांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
कुष्ठरोगाच्या कामाला वाहून घ्यायचे ठरल्यावर बाबांनी या रोगाचा अभ्यास करायला सुरुवात केली. एखाद्या कामात पूर्ण झोकून दिल्याशिवाय बाबा स्वस्थ बसणारे नव्हते. त्यांनी वर्ध्याजवळच्या ‘दत्तपूर कुष्ठधामा’त जायला सुरुवात केली. हे कुष्ठधाम मनोहर दिवाण यांनी सुरू केले होते. तिथे कुष्ठसेवेच्या प्रशिक्षणाची सोय होती. त्यापाठोपाठ बाबांनी सेवाग्राम येथे जाऊन ‘लेप्रसी ट्रेनिंग’चा दोन महिन्यांचा कोर्सही केला.
दत्तपूर कुष्ठधामात काही दिवस अनुभव घेतल्यावर बाबांनी वरोड्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कुष्ठरोग्यांना तपासण्याचे केंद्र उघडले. अनेक कुष्ठरोगी तिथे उपचारांसाठी येऊ लागले.
त्यानंतर १९४९ मध्ये बाबांनी आपल्या काही मित्रांच्या सहाय्याने ‘महारोगी सेवा समिती’ स्थापन केली. पुढे या संस्थेची कायदेशीर नोंदणी करण्यात आली. कुष्ठपीडितांच्यावर औषधोपचार करणे व त्यांचे पुनर्वसन करणे ही या संस्थेची उद्दिष्टये होती.
कुष्ठरोगाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी बाबांनी कोलकाताच्या ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’ येथे जायचे ठरवले. तिथला अभ्यासक्रम अल्पमुदतीचा होता, पण तिथे प्रवेश घेण्यासाठी वैद्यकीय पदवी असणे आवश्यक होते. अर्थातच बाबांना प्रवेश मिळणे शक्य नव्हते कारण त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी नव्हती. परंतु पंतप्रधान नेहरूंच्या मध्यस्थीने बाबांनी तिथे प्रवेश मिळविला. त्यावेळी प्रसिद्ध संशोधक आणि कुष्ठरोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र हे संस्थेचे अधिष्ठाता होते.
डॉ. आर मोर गेरहार्ड हेन्रिक आर्माउर हॅन्सेन यांनी कुष्ठरोग हा ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्री’ या जंतूमुळे होतो हे शोधले होते. परंतु हे जंतू कृत्रिम माध्यमावर वाढविण्यात शास्त्रज्ञांना यश आले नव्हते. माणसाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला कुष्ठरोग होत नाही - म्हणजे हे जंतू दुसऱ्या कोणत्याही प्राण्यांच्या शरीरात वाढत नाहीत, त्यामुळे या रोगावर लस बनविता आली नव्हती. अर्थात अजूनही अशी लस तयार झालेली नाही.
या संस्थेत शिकत असताना बाबांनी स्वतःवर एक धाडसी प्रयोग करून घेतला. डॉ. धर्मेंद्र एकदा व्याख्यान देत असताना म्हणाले, ‘कुष्ठरोगाचा जंतू फक्त माणसाच्या शरीरातच वाढतो त्यामुळे अजून या रोगावर लस विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेलं नाही, कारण कोणीही निरोगी माणूस हा जंतू स्वतःला प्रयोग करण्यासाठी का टोचून घेईल?’ बाबांनी लगेचच ठरवले की आपण स्वतःवर प्रयोग करून घ्यायचा.
काही करायचे निश्चित केले की बाबा मागे हटत नसत. त्यांनी एकदा मृत जंतू व एकदा जिवंत जंतू स्वतःच्या शरीरात टोचून घेतले. सुदैवाने बाबांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. अर्थात ही चाचणी करण्यापूर्वी त्यांनी साधनाताईंची परवानगी घेतली. त्यांना कुष्ठरोग झाला तरी साधनाताई त्यांची काळजी घेतील याची त्यांना शाश्वती होती. त्या दोघांमधील अढळ विश्वासाची ही पावती होती. साधनाताई तर म्हणत, “आमचे जीवन म्हणजे सततची अडथळ्यांची शर्यत आणि सोशिकपणाची परीक्षा होती.”
बाबांनी कुष्ठरोग प्रशिक्षण पूर्ण केले, पण डॉ. नसल्यामुळे त्यांना सर्टिफिकेट मिळाले नाही.
१९५१ साली प्रशिक्षणाहून परत आल्यावर बाबांच्या ‘महारोगी सेवा समिती’ संस्थेला मध्य प्रांत आणि वऱ्हाड सरकारकडून वरोड्यापासून पाच किलोमीटर अंतरावर पन्नास एकर जंगल जमीन मिळाली. ही जमीन पडीक, काट्याकुट्याने, दगडधोंड्यांनी भरलेली होती. ती शेतीसाठी व राहण्यासाठी योग्य करायला प्रचंड मेहनत करावी लागणार होती. बाबांचा पहिला कार्यकर्ता म्हणजे साधनाताई आणि दत्तपूरच्या कुष्ठधामातले सहा कुष्ठरोगी. आसपास पाण्याची सोय नव्हती. त्याशिवाय आजूबाजूला वाघ, चित्ता यांसारखे हिंस्र प्राणी व साप, विंचू यांची प्रचंड संख्या.
त्या जमिनीवर वस्ती करायची तर प्रथम विहीर खणणे आवश्यक होते. पाणी नसेल तर काहीही करणे शक्यच नव्हते. लगेचच बाबा व सहा कुष्ठरोगी विहीर खणण्याच्या कामाला लागले. रोज सकाळी कुदळी, फावडी घेऊन जंगलात जायचे व खणायला सुरुवात करायची, ती अगदी काळोख पडेपर्यंत. सकाळी उठून साधनाताई डबा करून घ्यायच्या आणि मजल दरमजल करीत सर्वांनी त्या ठिकाणी जायचे, असा कार्यक्रम सुरू झाला. मजूर मिळणे शक्यच नव्हते. एकतर बाबा कुष्ठरोग्यांबरोबर काम करीत होते आणि दुसरे म्हणजे बाबांकडे मजुरांना द्यायला पैसेही नव्हते. शेवटी अथक परिश्रमानंतर विहिरीला पाणी लागले आणि बाबांचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा निर्माण झाली. पाण्याच्या दर्शनाने त्यांना शुभ शकुनच झाला होता. खरे तर अशा जमिनीवर काही काम सुरू करणे हे अत्यंत कठीण होते, पण बाबा निधड्या छातीचे होते. त्यामुळे त्यांनी हे काम स्वीकारले.
विहीर खणत असतानाच एक झोपडी तिथे बांधली गेली आणि ते सहा कुष्ठरोगी तिथे राहू लागले. बाबा व त्यांचे कुटुंब मात्र रोज तीन-चार मैल पायपीट करून जेवण, पाणी घेऊन तिथे येत असत. विकास तेव्हा चार वर्षांचा, तर प्रकाश तीन वर्षांचा होता. मुले लहान होती त्यामुळे ती थोडे अंतर चालत आणि थोडा वेळ बाबा त्यांना कडेवर घेत.
विहिरीला पाणी लागल्यानंतर बाबांनी तिथे दुसरी झोपडी बांधली, पण या झोपड्या भिंतीशिवाय होत्या. वर छप्पर होते, पण बाजूला भिंती नसल्याने जंगली प्राण्यांची सतत भीती असे. शिवाय जमिनीवर साप, विंचू यांचा वावर होता. बाबांकडे चार मोठे कुत्रे होते. पण ते वाघांनी पळवून नेले. बाबा एखाद्या ऋषीप्रमाणे या जंगलात राहत होते. बाबा स्वप्नातच होते आणि साधनाताई त्या स्वप्नाशी एकरूप झाल्या होत्या. खरे तर विहीर खणणे, जमीन सपाट करणे ही कामे प्रचंड कष्टदायक होती. काम करणाऱ्या त्या सहा कुष्ठरोग्यांना कुदळ हातात धरण्यासाठी हाताची बोटेही नव्हती. अशा परिस्थितीत विहिरीला पाणी लागल्यावर बाबांना अतिशय आनंद झाला. धन्य त्या बाबांची आणि कुष्ठरोग्यांची!
विहीर खणून झाली, दोन झोपड्या बांधून झाल्या. या वसाहतीचे उद्घाटन विनोबाजींच्या हस्ते २१ जून १९५२ रोजी करण्यात आले. विनोबाजींनी पहिल्या सहा कुष्ठरोग्यांना झोपडीत नेले आणि ‘या ठिकाणी सेवेचे रामायण घडेल,’ असा बाबांना आशीर्वाद दिला. बाबांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव ‘महारोगी सेवा समिती’ असे होते, परंतु बाबांनी या नवीन वसाहतीचे नाव ‘आनंदवन’ असे ठेवले. त्यांच्या मते जन्माला आलेल्या प्रत्येकाला जीवनात आनंद प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे, मग तो अंध, अपंग, बहिरा, मुका, कुष्ठरोगी कोणीही असो. प्रत्येक जातीमधल्या व्यक्तीचे अंतिम उद्दिष्ट ‘आनंद मिळवणे’ हेच असते.
बाबांना जी जमीन सरकारने दिली होती, ती म्हणजे नुसते काट्याकुट्यांनी जंगली झुडपांनी भरलेले जंगलच होते. ही काटेरी झाडे तोडायची, दगडधोंडे दूर करून जमीन सपाट करायची, विहिरी खणायच्या यासाठी खडतर कष्ट करावे लागणार होते. पण बाबांनी त्या कुष्ठरोग्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला, ‘मी माझ्या हक्कासाठी, माझ्या आनंदासाठी कष्ट करत आहे,’ ही जाणीव निर्माण केली व त्यातूनच आनंदवन उभे राहिले. आनंदवन साकारण्यासाठी अनेकांचे हात कामाला लागले. विहिरीला पाणी लागल्यावर बाबांनी त्यावर मोट बसवली आणि शेती करणे सुरू झाले.
सुरुवातीचा काळ प्रचंड कष्टाचा होता, पण त्यात आनंद होता. एकीकडे आनंदवनात घरे बांधणे, शेती करणे, विहिरी खणणे ही कामे बाबा करीतच होते. पण त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांत जाऊन कुष्ठरोग्यांचा शोध घेणे, त्यांच्यावर उपचार करणे हे कामही चालूच होते. एक माणूस किती काम करू शकतो, अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवू शकतो हे बाबांच्या कामाकडे पाहिल्यावर कळते. महान ध्येय, कष्ट करण्याची व स्वप्न साकार करण्याची जिद्द, शारीरिक क्षमता वाढविण्याची तयारी असेल तर सामान्य माणूस सुद्धा असामान्य कार्य करू शकतो, हेच खरे आहे.
आनंदवनाच्या उद्घाटन प्रसंगी विनोबाजी म्हणाले होते, “स्वतःच्या श्रमातून तुम्ही जीवनात आनंद निर्माण केला आहे, त्यामुळे ‘आनंदवन’ हे नाव सार्थ आहे.” ते पुढे म्हणाले, “ही कुष्ठरोग्यांची वसाहत नाही. कुष्ठरोग्यांचं निवास केंद्र नाही, तर इथे आधुनिक राम व सीता येऊन राहिली आहेत. ते इथे रामराज्य निर्माण करतील.”
१९५१ मध्ये श्री. यदुनाथ थत्ते बाबांचा प्रकल्प पाहायला आले. “साने गुरुजींच्या मनोभूमीत तरळणारी स्वप्ने भूमीवर उतरवण्यासाठी आसुसणारा, बेचैन झालेला माणूस मला दिसला. गुरुजींनी जे साहित्यात रंगवले, पण भूमीवर उतरवण्याची उसंत त्यांना मिळाली नाही, तेच इथे घडत असलेले मला दिसले,” असे उद्गार त्यांनी काढले.
कित्येकदा संस्थेचे नाव त्या संस्थेचे उद्दिष्ट दाखवून देतात. बाबांनी ‘मुक्तिसदन’, ‘संधिनिकेतन’, ‘सुखसदन’ अशी योग्य, सार्थ नावे आपल्या प्रकल्पांना दिली. त्यांना समाजातल्या वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित लोकांना आधार किंवा राहण्यासाठी आश्रम द्यायचा नव्हता तर या लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा होता, त्यांना आत्मसन्मान, आत्मविश्वास मिळवून द्यायचा होता, ही भावना त्यातून दिसून येते. ‘मी सुद्धा स्वावलंबी होऊन माझे जीवन आनंदात व्यतीत करू शकतो. मला दयेची भीक नको,’ ही जाणीव त्यांच्या मनात निर्माण करायची होती.