बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
समाजकार्य यशस्वी व्हायचे असेल, तर त्याला आधुनिक विचार, नियोजन आणि उत्पादनक्षम दृष्टिकोनाची जोड आवश्यक असते. उपेक्षितांना आधार देताना बाबांनी आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग, ऊर्जा व्यवस्थापन आणि संसाधनांच्या योग्य वापरावर भर दिला. बदलत्या काळाशी जुळवून घेत समाजकार्यात नवे प्रयोग कसे करता येतात, याचे प्रभावी उदाहरण तयार केले. आनंदवनातील अशाच आधुनिक आणि विधायक उपक्रमांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
टिन कॅन प्रोजेक्ट
स्वित्झर्लंडमधील भारताचे वकील श्री. वेलोंदी व त्यांच्या पत्नी यांनी ‘स्विस एड ॲब्राॅड’ या संस्थेला आनंदवनाची माहिती कळवली. ही संस्था जगातल्या अत्यंत गरजू संस्थांना मदत करते. या संस्था समाजासाठी झटणाऱ्या असाव्यात, ही त्यांची अट. स्विस एड ॲब्राॅड हे नाव ‘श्र्वायझर आउ सलॅंड इल्फ’ असे आहे. या संस्थेने आनंदवनाची संपूर्ण माहिती मिळवली आणि आनंदवनाला ३०,००० स्विस फ्रॅंकची देणगी दिली. या देणगीमुळे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासंबंधीच्या बाबांच्या कल्पनेतील ‘कृषी औद्योगिक प्रतिमाना’स सुरुवात झाली. या देणगीतून टिनच्या पत्र्याच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करायची असे बाबांनी ठरवले. टिनच्या पत्र्यापासून संसाराला उपयोगी पडतील अशा वस्तू बनवता येतात. गाळणी, चाळण्या, डबे, दिवे, पंचपाळी अशा अनेक वस्तूंना ग्रामीण बाजारपेठेत मागणी होती. २९ नोव्हेंबर १९६० मध्ये ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ सुरू करण्यात आला. ३०,००० रुपयांची यंत्रसामुग्री व सहा हजार रुपयांचा कच्चा माल एवढ्या भांडवलावर कारखाना सुरू झाला आणि थोड्याच दिवसांत पाऊण लाखाचा माल विकला गेला. भारतासारख्या लोकसंख्या अधिक असलेल्या देशात श्रमाला महत्त्व दिले गेले पाहिजे. या प्रोजेक्टमध्ये हेच तंत्र वापरले गेले. कमी भांडवल व जास्त श्रम वापरून वस्तू तयार झाल्या. आनंदवनामध्ये पैशाची चणचण होती आणि अनेक कुष्ठरोगमुक्त रुग्ण उपलब्ध होते. या प्रकल्पामुळे त्या लोकांना रोजगार मिळाला व अनेक लोक स्वावलंबी बनले.
बायोगॅस प्रकल्प
गायी म्हशी पाळल्या म्हणजे रोज शेण जमा होते. आनंदवनामध्ये रोज साडेपाच ते सहा टन शेण गोळा होत होते, कारण गायींची संख्या जास्त होती. शिवाय स्वयंपाकघरातील भाज्यांची सालं, टरफलं असा ओला कचरा जमा व्हायचा. आनंदवनातील कुठलीही गोष्ट वाया जाता कामा नये, असा बाबांचा आग्रह. सर्वाचा, अगदी मानवी मलमूत्राचा देखील आनंदवनात वापर करून घेतला जात असे. १९७८ साली पहिला बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला. एक एक करीत आनंदवनात एकूण सात बायोगॅस प्रकल्प उभे करण्यात आले. हे प्रकल्प तयार झाल्यावर आनंदवनात ड्रेनेज लाईन तयार झाली. उतार असलेले संडास बांधण्यात आले. यामुळे पाणी कमी लागे आणि पाण्याची बचत ही होई, असा दुहेरी फायदा होऊ लागला. बायोगॅस प्रकल्पामध्ये जेवढे कमी पाणी जाईल तेवढे चांगले असते. अशा संडासांमुळे तोही फायदा झाला.
आनंदवनामध्ये अचंबित करणाऱ्या अनेक नवीन कल्पना अमलात आणल्या गेल्या, एक ड्रेनेज पाईप तलावाकडे सोडला गेला, ज्यामुळे माशांची वाढ चांगली होऊ लागली. जिथे गुरांसाठी चारा वाढविला जाई, तिथे काही पाईपमधले पाणी सोडण्यात आले, त्यामुळे चाऱ्याची वाढ जास्त प्रमाणात झाली. अशा पद्धतीने सांडपाण्याची व्यवस्था नीट लावली गेली. कोणतीही गोष्ट वाया न जाता त्यातून ‘पर्यावरणपूरक’ असे काय करता येईल याची पुरेपूर काळजी आनंदवनात घेण्यात आली.
बायोगॅस प्रकल्पामुळे सांडपाण्याची व्यवस्था तर झालीच, पण स्वयंपाकघरात वापरण्यासाठी कमी खर्चात इंधनही उपलब्ध झाले. पर्यावरणाची हानी न होता हे सर्व करता आले.
उद्योग व्यवसाय
सर्वप्रथम बाबांनी आनंदवनामध्ये चरखे आणले आणि सूत कातायचे काम सुरू झाले. गांधीजींच्या ‘सेवाग्राम आश्रमा’तून वेळू यायचे व त्याचे सूत कातून सेवाग्रामला पाठवले जायचे. हळूहळू चरख्यांची संख्या वाढली, कुष्ठरोग्यांना काम मिळू लागले, आणि त्याचबरोबर त्यांना थोडेफार पैसेही मिळू लागले. यामुळे कुष्ठरोगी स्वावलंबी होण्यास मदत झाली. बाबा म्हणत, “दान माणसाला नादान बनवते. कुष्ठरोग्यांना दान देऊ नका, संधी द्या.” पहिल्यापासूनच बाबांचा उद्देश कुष्ठरोग्यांना स्वाभिमानी व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा होता आणि म्हणूनच त्यांनी कुष्ठरोग्यांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त केले. बहुतेक कुष्ठरोगी मनाने खचलेले असतात, निराश झालेले असतात, कारण त्यांना कुटुंबाने, समाजाने बहिष्कृत केलेले असते. घरातल्या लोकांनी दूर केल्यामुळे काही जण तर निराशाग्रस्त अवस्थेत आत्महत्या करतात. अशा लोकांचे मन गुंतून राहील, जगण्याविषयी आशा उत्पन्न होईल, असे काही करणे आवश्यक होते, म्हणून बाबांनी कुष्ठरोग्यांना आवडेल, जमेल ते कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी बनवण्याकडे लक्ष दिले. सूत कातताना, सूत जोडताना थुंकी लावावी लागते. त्यावरून कुष्ठरोगी सुताला थुंकी लावत, त्यामुळे कुष्ठरोग पसरतो, अशी गोष्ट समाजात पसरली. यासाठी सूत निर्जंतुक करणे आवश्यक आहे, हे ऐकल्यावर १९६४-६५ मध्ये सूत कातण्याचा व्यवसाय बंद पडला.
टिनच्या वस्तू बनविण्याचे काम तर सुरू झालेच होते. पुढे प्लास्टिकच्या वस्तू बाजारात आल्या आणि हा व्यवसायसुद्धा बंद पडला. तोपर्यंत बाबांनी आनंदवनात फॅब्रिकेशनमध्ये अनेक वस्तूंचे उत्पादन सुरू केले होते. त्याकाळी वरोड्याच्या आजूबाजूला प्रिंटिंग प्रेस नव्हती. बाबांनी आनंदवनात प्रिंटिंग प्रेस सुरू केली. हळूहळू आजूबाजूच्या गावातून छपाईची कामे प्रिंटिंग प्रेसकडे येऊ लागली. शिवाय संस्थेचे छपाईचे काम होतेच. सुरुवातीला साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित असलेले ‘आंतर भारती’ हे मासिक याच छापखान्यात छापले जायचे. नंतर सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज यांच्यासाठीही छापखान्यात छपाई होऊ लागली. सरकारने पुरवलेल्या कागदातून स्वस्तातल्या वह्या तयार होऊ लागल्या. या वह्यांना आजूबाजूच्या गावातून प्रचंड मागणी होती, कारण आनंदवनात तयार झालेला माल उत्तम दर्जाचा असे. शिवाय किंमतही वाजवी. तिथे दर्जाशी तडजोड केली जायची नाही. पुढे मुंबई, पुणे या शहरांतून देखील वह्यांना मागणी येऊ लागली. थोडक्यात, आनंदवनात तयार होणाऱ्या वह्यांनी बाजारपेठा काबीज केल्या.
१९५८ च्या सुमारास ‘मधुमक्षिका पालन’ सुरू झाले. कुष्ठरोगी काहीही करू शकतात, ते कुणापेक्षाही कमी नाहीत, हेच बाबांना समाजातील लोकांना सांगायचे होते. सूतकताई बंद पडल्यावर साठच्या दशकात बाबांनी आनंदवनात हॅन्डलूमचा प्रयोग सुरू केला. काही कुष्ठरोगी विणकर होते. त्यांनी हा व्यवसाय करायची तयारी दाखवली. आनंदवनामध्ये लोकांना कापडाची गरज होतीच. काही वर्षांनी हॅन्डलूमची जागा पॉवरलूमनी घेतली. तरी अजून काही कामे हॅन्डलूमवरच होतात.
यानंतर सतरंजी तयार करण्याचा व्यवसाय चालू करण्यात आला. त्यासाठी लागणारे काही सामान नागपूरहून आणण्यात आले, तर सूत विणण्याच्या कांड्या, सूत ओढण्याचे पंजे, रंगीत सूत आनंदवनातच तयार केले गेले. आता निरनिराळ्या रंगांच्या, आकारांच्या व डिझाईन्सच्या उत्कृष्ट सतरंज्या आनंदवनात तयार होऊ लागल्या. या सतरंज्यांना बाजारपेठेत खूप मागणी आली. त्यामुळे आनंदवनात एक प्रचंड मोठा हॉल सतरंजी विभागासाठी दिला गेला. इथे हाताने सतरंज्या विणल्या जाऊ लागल्या. मोठ्या आकाराच्या सतरंज्यासुद्धा इथे तयार केल्या जाऊ लागल्या. या सतरंज्यांची रंगसंगती मनोवेधक होती व त्या दणकट होत्या.
पॉवरलूम्समुळे प्रत्येक लूमवर आठ तासात १०० मीटर कापड तयार होऊ लागले. पॉवरलूम्स घ्यायचे तर सरकारची मान्यता आणि परवाना लागत असे. आनंदवनातील ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा अजून परवानगी मिळाली नव्हती. याचवेळी, म्हणजे १९८३ मध्ये आनंदवनात झालेल्या मित्रमेळाव्याला, दिलीप हेर्लेकर हे मुंबईचे टेक्स्टाईल इंजिनियर आले होते. त्यांनी सरकारकडून परवानगी तर मिळवलीच, पण आनंदवनात येऊन पॉवरलूम बसवण्याची जबाबदारी देखील स्वतःच्या अंगावर घेतली. हा परवाना जेव्हा मिळाला तेव्हा बाबा मुंबईला ऑपरेशनसाठी आले होते. दिलीप हेर्लेकर बाबांना भेटले तेव्हा बाबांनी हेर्लेकरांना एक कोरा चेक दिला आणि सांगितले, ‘जे काही करायचं ते तुम्ही ठरवा. माझा तुमच्यावर विश्वास आहे.’ माणसे ओळखण्याची आणि त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना आपल्या कार्यात सामील करून घेण्याची बाबांची हातोटी कमालीची होती. बाबांच्या या कृतीमुळे पुढे हेर्लेकर मुंबईतील नोकरी सोडून आनंदवनात नोकरीला आले आणि त्यांनी आनंदवनातील सगळ्या व्यवसायांचा भार उचलला. जेव्हा बाबा, साधनाताई किंवा डॉ. विकास आनंदवनात नसत, तेव्हा हेर्लेकरांवर संपूर्ण आनंदवनाची जबाबदारी असे.
माणसाची एक कृती काय जादू करून दाखवते! अर्थात बाबांच्या अशा व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांनी असंख्य माणसे जोडली आणि शून्यातून निर्मिती करून दाखविली. आनंदवनाची जागा म्हणजे एक ओसाड रान होते, उजाड माळरान होते. अशा माळरानावर बाबांनी प्रतिसृष्टी निर्माण केली, याचे कारण त्यांनी स्वतः तर कष्ट केलेच, पण आपल्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांना जोडून घेतले. कार्यकर्त्यांवर विश्वास टाकला. एखादे काम कुणावर टाकल्यावर ते त्यात फारशी ढवळाढवळ करीत नसत.
टिन कॅन प्रकल्पाच्या बरोबरच आनंदवनात मेटल फॅब्रिकेशनला सुरुवात झाली होती. पलंग, टेबल, कपाटे इत्यादी वस्तू तयार होऊ लागल्या. प्रथम या वर्कशॉपचा उपयोग आनंदवनाची गरज भागविण्यासाठी होऊ लागला, पण नंतर वर्कशॉपमधले सर्व लोक एकत्र येऊन बाहेरच्या मोठमोठ्या ऑर्डर्स घेऊ लागले. आणखी एक नवीन उत्पादन इथे सुरू झाले ते म्हणजे एअर कूलर्स. विदर्भात प्रचंड उन्हाळा असतो त्यामुळे एअर कूलर्सना मोठी मागणी होती. आनंदवनामध्ये दुरुस्तीसाठी एक वर्कशॉप होते. तिथल्या कारागिरांनी दुरुस्तीसाठी आणलेला एक एअर कूलर उघडून पाहिला आणि त्यांना वाटले असा एअर कूलर आपण बनवू शकू. आणि एक नवीन उद्योग सुरू झाला - तो म्हणजे एअर कूलर्स बनवण्याचा. असाच एक नवीन प्रयोग झाला ‘डीप फ्रिजर’ बनविण्याचा. हेमलकसामध्ये प्राण्यांना लागणारे मटण ठेवण्यासाठी याचा उपयोग झाला. अशा प्रकारे आनंदवनामध्ये निरनिराळे प्रयोग केले गेले आणि त्यातून नवनवीन वस्तू बनविल्या गेल्या. काही वस्तू फायदेशीर ठरल्या, विकल्या गेल्या, आनंदवनाला आर्थिक फायदा देऊन झाला, तर काही व्यवसाय बंद पडले.
आनंदवनामधील कुष्ठरोग्यांना वापरता येतील अशा तीन चाकी सायकली बनविण्याचा प्रयोग सुद्धा यशस्वी झाला. त्यावेळी काही जणांसाठी चाकाची खुर्ची म्हणजे व्हीलचेअर वापरली जायची. पण ही व्हीलचेअर ढकलण्यासाठी एक माणूस लागतो. तीन चाकी सायकली होत्या, पण त्यात काही त्रुटी होत्या. कुष्ठरोगी या सायकली चालवू शकत नव्हते. काही कुष्ठरोग्यांना कृत्रिम पाय बसविलेले होते. शिवाय या सायकली आकाराने मोठ्या होत्या. आनंदवनातील वर्कशॉपमध्ये तयार झालेल्या तीन चाकाच्या सायकली राज्याच्या कानाकोपऱ्यात गरजूंपर्यंत पोहोचू लागल्या आणि अनेक अपंग कुष्ठरोगी स्वावलंबी झाल्याचा, एकटे फिरण्याचा आनंद लुटू लागले.
बाबांच्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्दच नव्हता, त्यामुळे आनंदवनामध्ये कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नसतानाही आनंदवनातील लोक वेगवेगळी कामे लीलया करू शकत. काही मंडळी गाड्या दुरुस्त करत, तर काही लोक इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उपकरणांची देखभाल करत. यात त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नव्हते. ते या सर्व गोष्टी हे लोक बघून बघून शिकले. ‘कोणतंही काम हातात घेतले की ते शिकून त्यात तरबेज व्हायचे, तोपर्यंत थांबायचेच नाही,’ असा मंत्रच बाबांनी आनंदवनामधील लोकांना दिला होता. आनंदवनामध्ये एक ग्रुप तयार झाला जो फिटिंग, प्लंबिंग, मोटर रिवाइंडिंग ही सर्व कामे सहजपणे करू लागला. आनंदवन हे एक मोठे गावच झाले आणि त्यात हे ‘बारा बलुतेदार’ तयार झाले.
कोणत्याही कामासाठी आनंदवनामध्ये लोकांना बाहेरच्या लोकांवर अवलंबून राहावे लागेनासे झाले. सर्व कामे आनंदवनामधील लोकच करू लागले आणि बाहेरच्या लोकांची कामे करून पैसेही मिळवू लागले. बाबांनी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण झाले. येथे कुष्ठरोगी कुठल्याही प्रकारे लाचार राहिले नाहीत. वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करून ते स्वावलंबी तर झाले आणि ते समाजातल्या इतर लोकांनाही मदत करू लागले.
आनंदवनात कुष्ठरोग्यांची संख्या वाढल्यानंतर एक नवीन उद्योग सुरू करण्यात आला, तो म्हणजे चपला बनवणे. या चपला मायक्रो सेल्युलर रबर पासून बनवण्यात येत होत्या. त्याला खिळे नसायचे. सुरुवातीला कुष्ठरोग्यांपुरत्याच या चपला बनवण्यात आल्या. मग लक्षात आले की मधुमेही लोकांना पण अशाच चपला वापरणे गरजेचे आहे. खिळे नसल्यामुळे जखम होण्याची शक्यताच नाही. १९७४ पासून अशा चपला विक्रीस ठेवण्यात आल्या. नथू सोनेकार, सोनबा मोहकर हे कारागीर या कामात तरबेज होते. हळूहळू या चपलांच्या डिझाईन व फिनिशिंगमध्ये चांगले बदल होऊ लागले आणि अनेक लोक फक्त आनंदवनात बनविलेल्या चपला वापरू लागले. ही कारागिरांना मिळालेली पावतीच होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चपला बनविणारा कोणीही कारागीर पूर्वापार हे काम करणारा नव्हता. चपला बनविण्याचे कौशल्य त्यांनी बघून आत्मसात केले होते आणि त्यात ते तरबेज झाले होते. अशा अनेक पातळ्यांवर आनंदवनाने जाती-पातीचे आणि त्यातून आलेल्या व्यवसायाच्या सक्तीचे कुंपण मोडून काढण्याचे महत्त्वाचे काम केले.
त्याशिवाय आनंदवनात चामड्याच्या वस्तू बनविल्या जात. चामड्याच्या पिशव्या, पर्सेस, दप्तरे, पाठीवरच्या सॅक अशा अनेक वस्तू वाजवी दरात लोकांना उपलब्ध करून दिल्या गेल्या. चामड्यापेक्षा रेग्झिन स्वस्त म्हणून ग्रामीण भागात त्याला जास्त मागणी होती. यामुळे कारागीर वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण डिझाईनच्या वस्तू तयार करत ज्याला बाजारात खूप मागणी आली.
आनंदवनात कापड विणले जात होते. त्याचबरोबर शिलाई काम सुरू करण्यात आले. इथे अनेक स्त्रिया शिवणकामाचे शिक्षण घेऊन सुंदर कपडे शिवत आणि त्यातून आनंदवनाची गरज भागे. अपंग व कर्णबधिरांसाठी शिवणकाम हा चांगला उद्योग ठरला.
आनंदवनात इतरही अनेक लहान सहान उद्योग चालत जसे पोहे तयार करणे, पॉपकॉर्न बनवणे, भेटकार्ड बनवणे, इत्यादी. त्यातून प्रत्येकाच्या हाताला त्याच्या योग्यतेचे काम मिळू लागले. आनंदवनात कोणीही माणूस रिकामा राहिला नाही. प्रत्येक जण त्याला आवडेल ते, जमेल ते काम करू लागला. आजूबाजूला हेच वातावरण होते. कुठेही निराशा नाही, सर्वत्र सकारात्मक, ऊर्जेने भरलेले, आनंदी वातावरण झाले. टाकाऊ वस्तूंचा उपयोग भेटकार्ड बनवण्यासाठी केला गेला. धान्याची टरफले, बिया, चिंध्या अशा वस्तू भेटकार्ड बनवण्यासाठी वापरल्या जाऊ लागल्या.
आनंदवनात काष्ठशिल्पांचा एक विभाग सुरू करण्यात आला. हा विभाग व्यवसायात मोडत नाही कारण काष्ठशिल्प विकण्याची परवानगी नाही. पण लाकडावरच्या कोरीव कामाचे सुंदर नमुने तिथे ठेवण्यात आले. मोठाल्या लाकडाच्या ओंडक्यांचे आकार कायम ठेवून त्यापासून टेबल, खुर्च्या, स्टूल अशा अनेक गोष्टी बनवण्यात आल्या.
आनंदवनात चालणाऱ्या अशा लहान मोठ्या उद्योगांची जर यादी केली तर इथे तयार होणाऱ्या उत्पादनांची संख्या जवळपास १४० पर्यंत गेली.