बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
पंजाब शांतता यात्रा
१ जुलै १९८६ रोजी बाबा पंजाबमधील ‘पीस बाय पीस मिशन’ या शांतता यात्रेला निघाले व ९ ऑगस्ट १९८६ रोजी आनंदवनात परतले. या यात्रेचा काळ मर्यादित होता. यात्रेदरम्यान बाबांनी अनेक शीख कुटुंबीयांची भेट घेतली. हिंसाचारामध्ये ज्यांचे निकटवर्तीय मारले गेले, त्यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. त्याचप्रमाणे राजकारणी, व्यावसायिक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचीही भेट घेतली.
भारत जोडो अभियानात बाबा प्रथम पंजाबात गेले. तेथील अस्थिर वातावरण त्यांनी पाहिले आणि त्यांना अत्यंत दुःख झाले. शीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते. अनेक शीख लष्करात कार्यरत आहेत. भारताची इतर देशांशी युद्धे झाली तेव्हा ते प्राणपणाने लढले होते. असे असताना भिंद्रनवाले व त्यांचे अनुयायी फुटीरतेची भाषा वापरत होते. ‘स्वतंत्र खलिस्तान’ची मागणी करून तरुणांची माथी भडकावत होते. हे कुठेतरी थांबायला हवे होते. पंजाबात शांतता प्रस्थापित करणे गरजेचे होते. म्हणून बाबांनी हे मिशन हाती घेतले. त्यांनी जालंधर, पठाणकोट, चंदीगड, फिरोजपूर अशी मोठी शहरे आणि छोटी खेडी यांना भेटी दिल्या. तणावपूर्ण भागांमध्येही ते गेले. निरनिराळ्या थरांतील लोकांना भेटून त्यांना सामंजस्याचे आवाहन केले. हे करत असताना बाबांना अनेक धमक्या येत होत्या, परंतु त्यांनी सरकारने देऊ केलेली वैयक्तिक सुरक्षा नाकारली.
पंजाबच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी बाबांनी दोनदा पंतप्रधानांना भेटायचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही. पंजाबमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. ही परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून बाबा २५ सप्टेंबर १९८६ रोजी तिसऱ्यांदा पंजाबला आले. कित्येक ठिकाणी असंतुष्ट शीख लोक बाबांबरोबर चर्चा करायलासुद्धा नकार देत होते. त्यामुळे बाबा कधी कधी निराश होत, पण दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहाने ते लोकांना भेटायचा प्रयत्न करत.
पंजाबला भेट देण्यापूर्वी बाबांनी राष्ट्रपती व्यंकटरमण यांना पत्र लिहून कळवले होते, ‘उभयपक्षी मुत्सद्देगिरी आणि परस्पर सामंजस्य असले पाहिजे. अजून वेळ गेलेली नाही. हिंदू व शीख असोत किंवा हिंदू व मुस्लिम असोत, दोन्ही जमातीत परस्पर समजूतदारपणा असला पाहिजे, तरच आपण आपली एकात्मता अबाधित राखू शकू.’ पुढे बाबा लिहितात, ‘अपार करुणेची मूर्ती असलेले गांधीजी माझ्या लटपटणाऱ्या पायांना मार्गदर्शन करीत आहेत. गांधीजी माझ्या वाटेवरचा प्रकाश आहेत. पंजाबमध्ये जे घडत आहे, ते तर वादळाचा बावटा आहे.’
या त्यांच्या पत्राची दखल पंजाब केसरी या दैनिकाने घेतली. ४ सप्टेंबर १९८७ च्या अंकात छापून आले, ‘पंजाबची समस्या प्रेमाच्या मार्गाने, चर्चेतून सुटू शकते, असा बाबांचा विश्वास आहे. ज्यावेळेस सत्ताधारी पक्षातील किंवा इतर पक्षातील कोणीही नेता पंजाबमध्ये आला नाही, त्यांनी लोकांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्यावेळी दूरवरून, महाराष्ट्रातून धड उठू-बसू न शकणारे बाबा आपल्या प्राणांची पर्वा न करता पंजाबमध्ये येत आहेत. लोकांशी चर्चा करत आहेत. लोकांना धीर देत आहेत. हे मानवतेवरील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे.’
एका पंजाबी वृत्तपत्राने लिहिले, ‘बाबांजवळ पंजाबच्या समस्या सोडविण्याचे मार्ग नाहीत. पण ते म्हणजे प्रेमाचा महासागर आहेत. ते सहानुभूतीचा अखंड प्रवाह आहेत. त्यांचे विचार स्पष्ट व संयत आहेत. ते शीख तरुणांच्या मनातील क्रोधाची भावना समजू शकतात. आज पंजाबला प्रेमाचे चार शब्द हवे आहेत.’
बाबांच्या पंजाब भेटीमुळे किती फायदा झाला, याचे मोजमाप करणे शक्य नाही. खरेतर त्यांना शारीरिक व्याधीचा खूप त्रास होत होता. सर्व प्रवास त्यांनी गाडीमध्ये किंवा ट्रकमध्ये झोपूनच केला होता. ते कॉटवर झोपून लोकांशी संवाद साधायचे. परंतु त्यांचा उत्साह आणि निश्चय अवर्णनीय होता.
भारत जोडो अभियान २ (पूर्व-पश्चिम)
बाबांनी १९८५-८६ मध्ये दक्षिणेकडील कन्याकुमारीपासून उत्तरेकडे जम्मूपर्यंत भारत जोडो अभियान पूर्ण केले. नंतर त्यांना वाटायला लागले की आता पूर्व-पश्चिम अशीही यात्रा करावी. भारताच्या ईशान्येकडील भागात जी सात राज्ये आहेत, ती थोडीशी दुर्लक्षित होती. ती राज्ये म्हणजे अरुणाचल, मणिपूर, नागालँड, मिझोराम, मेघालय, आसाम व त्रिपुरा. १ नोव्हेंबर १९८७ रोजी ही यात्रा सुरू झाली व २६ मार्च १९८८ ला पूर्ण झाली. यात्रेचे अंतर ७५४६ किलोमीटर होते. यात्रा पूर्ण करायला १४६ दिवस लागले. या यात्रेत एकूण ७५ जण सहभागी झाले होते. त्यांनी ईशान्येकडील राज्यांची परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. अशा प्रकारे बाबांनी शारीरिक स्थिती बरी नसतानाही संपूर्ण भारत देश अक्षरशः पिंजून काढला.
नर्मदा आंदोलनात सहभाग
भारतात नर्मदा नदीला अगदी प्राचीन काळापासून महत्त्व प्राप्त झालेले आहे. नर्मदेच्या काठी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. अनेक ऋषीमुनी, देव-देवतांच्या तपोभूमी आहेत, असे म्हटले जाते. गंगा नदीनंतर नर्मदेला स्थान आहे. या नदीच्या काठी व आजूबाजूच्या जंगलात अनेक आदिवासी राहतात. नर्मदा तीराची जमीन अत्यंत सुपीक आहे. नर्मदेच्या खोऱ्यात अनेक अवशेष भग्नावस्थेत सापडतात, म्हणूनही तिला महत्त्व आहे.
भारत सरकारने या नदीवर दोन मोठी व अनेक लहान धरणे बांधायचा प्रकल्प आखला. सरदार सरोवर व नर्मदा सागर ही मोठी धरणे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारला प्रचंड खर्च येणार होता. दुसरे म्हणजे पाणी एका ठिकाणी साठवून ठेवल्यामुळे भूकंप होण्याची शक्यता पण वाढणार होती. या प्रकल्पामुळे तेथील लोकांच्या जीवनावर आणि पर्यावरणावर परिणाम होणार होता. बाबांचे निसर्गावर अत्यंत प्रेम होते. त्यामुळे त्यांना निसर्गाचा विध्वंस मानवत नसे. त्यांनी १९८८ साली जुलै महिन्यात भारतातील विविध ठिकाणच्या लोकांना आनंदवनामध्ये चर्चेसाठी बोलावून घेतले. हे लोक पर्यावरणवादी होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटणारे होते. सर्वांनी चर्चा करून एक निवेदनपत्र सरकारला सादर केले. त्यांच्या मते अशा धरणांमुळे ओला किंवा सुका दुष्काळ पडण्याचे आणि पूर येण्याचे प्रमाण वाढते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आजूबाजूचे गरीब लोक त्यांच्या घराला आणि जमिनीला मुकणार होते, त्यामुळे विस्थापितांचे प्रमाणही वाढणार होते. या पत्रामध्ये लिहिल्यानुसार, ‘या प्रकल्पामुळे निसर्गावर परिणाम होणार होता व थोड्याच श्रीमंत लोकांचा फायदा होणार होता.’
काही दिवसानंतर ‘नर्मदा बचाव आंदोलन’ सुरू झाले. या आंदोलनाच्या प्रमुख स्थानी मेधा पाटकर होत्या. नर्मदा खोऱ्यातील जे लोक आपल्या वडिलोपार्जित जमिनी सोडून देशोधडीला लागले होते, त्यांच्या पुनर्वसनासाठी मेधा पाटकर सरकारच्या विरोधात ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. विस्थापितांमध्ये बहुतेक लोक अशिक्षित होते, त्यामुळे त्यांच्या समस्या सरकारपुढे मांडायला कोणीही नव्हते. अशावेळी मेधा पाटकरांनी नेतृत्व स्वीकारले.
दुसरे ‘भारत जोडो अभियान’ पूर्ण झाल्यावर बाबा आनंदवनात परत आले. पण परतीच्या वाटेवर ते धुलिया येथे थांबून मेधा पाटकर आणि इतर लोकांना भेटले. याच भेटीत मध्य प्रदेशातील हर्सूद या ठिकाणी एक राष्ट्रीय मेळावा घेण्याचे ठरले. हर्सूद हे ठिकाण नर्मदासागर प्रकल्पामुळे पाणलोट क्षेत्रात जाणार होते. २८ सप्टेंबर १९८९ रोजी हा मेळावा भरविण्यात आला. यावेळी बाबा खूप आजारी होते. आनंदवनात पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा हात मोडला होता. अंगात पुरेसे रक्त नसल्यामुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता.
हा मेळावा खूप गाजला. भारताच्या विविध भागातून ५००० हून अधिक लोक या मेळाव्यास आले होते. बाबांनी मेळाव्यात गांधींच्या शब्दांत आपले म्हणणे मांडले, ‘स्त्री जशी आपल्या गर्भात उद्याचा भविष्यकाळ वागवते, तसेच भारतातील खेडेही आपल्या उदरात भविष्यकाळ वागवते. या प्रकल्पामुळे अंदाजे पाचशे खेडी उद्ध्वस्त होणार आहेत. आपल्या भविष्यकाळाची अशी चिता रचण्याचा अधिकार कोणालाही नाही.’
या मेळाव्यानंतर बाबांनी नर्मदा खोऱ्यात जाऊन राहायचे ठरवले. तेथील लोकांनी या गोष्टीला पाठिंबा दिला, पण बाबांचे कुटुंबीय व मित्रपरिवार या निर्णयाच्या विरोधात होते. त्यांना बाबांच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. पण बाबा ऐकणाऱ्यांतले नव्हते. शेवटी बाबा कसरावद येथे येऊन राहिले. त्यांनी ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या कारभारात कधीही ढवळाढवळ केली नाही. ते फक्त लोकांना नैतिक पाठिंबा देत असत. कसरावद हे गाव बदवानी शहराच्या जवळ आहे. बाबांबरोबर काही कुष्ठरोगी पण या नवीन ठिकाणी राहायला आले होते. बाबांचे येथे येऊन राहणे बऱ्याच लोकांना आवडले नव्हते, म्हणून त्यांच्यावर टीका झाली. अर्थात बाबा व साधनाताई अशा टीकेला अजिबात घाबरत नसत. बाबांनी त्यांच्या घराचे नाव ‘निजबळ’ असे ठेवले होते. अनेक लोक त्यांना येऊन भेटत असत. येथेही ते आदिवासी लोकांसाठी काम करत होते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक त्यांना येऊन भेटत. आपल्या समस्या सांगत आणि बाबा त्यांना सल्ला देत. कसरावद येथे आनंदवनापेक्षा जास्त हालअपेष्टा होत्या. पण बाबांनी हे स्वतःहून स्वीकारले होते. बाबा म्हणत, ‘माझा शेवट येथेच नर्मदेच्या तीरावर होणार.’
पुढे बाबा आणि मेधा पाटकर यांना ‘राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड’ जाहीर झाले. या पुरस्काराला नोबेल पुरस्काराचा दर्जा आहे. दोघांनी पुरस्कारापोटी मिळालेले पैसे ‘जनसहयोग विश्वस्त निधी’ निर्माण करण्यासाठी वापरले.
२५ डिसेंबर १९९० रोजी बदवानीपासून एक ‘लॉंग मार्च’ काढण्यात आला. यात ६००० पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. २०० किलोमीटर चालत जाऊन हा मोर्चा गुजरात राज्यात असलेल्या सरदार सरोवरापाशी समाप्त झाला. बाबांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. सहा जानेवारीला बाबा अतिश्रमाने बेशुद्ध होऊन कोसळले. सरकारने लोकांचा छळ केला, म्हणून ते आमरण उपोषणास बसले होते. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. १९९१ च्या जानेवारी महिन्यात बाबांनी सरकारला ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ हे पुरस्कार परत केले. या आंदोलनाचा एक फायदा असा झाला की जागतिक बँकेने नर्मदा प्रकल्पाचा पाठिंबा काढून घेतला.
एकूण दहा वर्षे बाबा नर्मदेच्या खोऱ्यात राहिले. बाबांचे नर्मदेवर प्रेम होते. नर्मदेच्या आरत्या, स्तोत्रे, कथा त्यांनी पाठ केल्या होत्या. ते नर्मदेला ‘मैया’ म्हणत असत. या दहा वर्षांत त्यांनी खूप काही सोसले. त्यांना दोन वेळेला हार्ट अटॅक आला. कानाने ऐकू येईनासे झाले. नवीन पेसमेकर बसवावा लागला. तरीही त्यांची जिद्द व उत्साह कायम होता. साधनाताई अधूनमधून आनंदवनात परत जात. त्यांना घराची ओढ लागली होती, म्हणून बाबांनी परत आनंदवनात जायचे ठरवले. खरेतर बाबांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत नर्मदेच्या तीरावर राहायचे ठरवले होते, पण साधनाताईंसाठी त्यांनी आपला निर्णय बदलला व ते आनंदवनात परत गेले.
आनंदवनामध्ये बाबांच्या आजूबाजूला खूप लोक असत. पण कसरावद येथील परिस्थिती वेगळी होती. एकतर बाबा गावाच्या बाहेर राहत होते आणि त्यांना भेटायला येणारी माणसे त्या मानाने कमी होती. साधनाताई कधी आनंदवन, तर कधी हेमलकसा असा मुक्काम करीत, त्यामुळे बाबा अगदीच एकटे पडले. त्यांचा चालताना तोल जात असे. धड बसणे सुद्धा त्यांना जमत नव्हते. बराच काळ ते कॉटवरच झोपून असत. जेव्हा लोक त्यांना भेटायला येत, तेव्हा ते आनंदी होत. तीच त्यांची खरी विश्रांती होती. पण त्यांची मानसिक शक्ती इतकी प्रचंड होती, की त्यांनी त्यांचे सर्व प्रकल्प त्यांच्या मानसिक बळामुळेच पूर्णत्वाला नेले होते.
विलास मनोहर त्यांच्या ‘मला न कळलेले बाबा’ या पुस्तकात म्हणतात, ‘बाबांबरोबर मी ‘नर्मदा बचाव’ आंदोलनात होतो. बाबा जेव्हा कसरावदला राहत होते, तेव्हा मीही त्यांच्याबरोबर राहत होतो. बाबांशी माझे बोलणे असे कमी व्हायचे, पण बाबा जेव्हा लोकांशी संवाद साधत, ते मी ऐकत असे. बाबा माझ्याशी डोळ्यांनी, त्यांच्या हाताच्या हालचालींद्वारे बोलत असत.’
विलास मनोहर पुढे म्हणतात, ‘बाबांची स्मरणशक्ती प्रचंड दांडगी होती, पण ती त्यांनी मिळवलेली होती. ते त्यांना भेटलेल्या व्यक्तीचे नाव, तो कोण, कुठला, काय काम करतो, हे सर्व लक्षात ठेवत असत. बाबा हिशोबाच्या बाबतीत अगदी पक्के होते. समाजाकडून मिळालेला पैसा योग्य पद्धतीने वापरला पाहिजे, त्याचा हिशोब काटेकोरपणे ठेवला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असे.
बाबा रामायण-महाभारतातील संदर्भ कधी देत नसत. त्यांच्या कवितेतून येशू व त्याची करुणा याला महत्त्व दिलेले आढळते. अनेक ख्रिश्चन लोक बाबांकडे येत, पण त्यांनी बाबांना कधी ‘येशू’ मानले नाही. ते बाबांना ‘गांधी’ म्हणत. बाबा येशूचे गुणगान करीत. परंतु हिंदू मंडळी बाबांना देवासमान मानत.’