बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
बाबांनी भव्य-दिव्य स्वप्ने पाहिली आणि साधनाताईंसमवेत ती दोघांनी एकत्रितपणे पूर्ण केली. साधनाताईंनी बाबांशी लग्न केल्यानंतर त्यांचे आयुष्य प्रत्यक्ष समाजसेवेला वाहून टाकले. बाबांच्या ठायी धाडस प्रचंड होते, त्यामुळे ते कुठलेही काम कधीही करायला तयार असत आणि साधनाताई त्यांना प्रत्येक पावलावर मदत करीत.
आनंदवनाचे काम सुरू केल्यावर बाबा व साधनाताई दोघांचेही आयुष्य अतिशय खडतर गेले. सुरुवातीला आनंदवनामध्ये साप, विंचू असायचे. याशिवाय पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळे व्हायची. रानडुकरांचा हैदोस असायचा. आर्थिक चणचण तर कायमचीच होती. याशिवाय दोघांच्याही प्रकृतीने असहकार पुकारला होता. प्रकाश आणि विकास दोघेही लहान होते. दोघांना बाबांनी वेगळ्या शाळेत घातले नाही. विकास व प्रकाश यांना मित्र असे नव्हतेच. ती मुले इतर कुष्ठरोग्यांबरोबरच मोठी झाली. याशिवाय नारायण, रेणुका, माया, बिजली अशी अनेक मुलं बाबा आणि साधनाताईंनी लहानाची मोठी केली. रेणुका व बिजली या दोघी रस्त्यावर सापडलेल्या होत्या. साधनाताईंनी त्यांना पोटच्या मुलींप्रमाणे वाढवले, प्रेम दिले आणि त्या त्यांच्या मानसकन्या झाल्या. पुढे परदेशातून आलेल्या काही स्त्रियांनी आनंदवनात राहून कार्य केले. अर्थात स्वयंपाकपाणी, झाडलोट, कपडे धुणे, भांडी घासणे या सर्व कामांची जबाबदारी साधनाताईंवरच होती.
सोमनाथ प्रकल्प सुरू करायच्या वेळी बाबांचे पाठीचे दुखणे विकोपाला गेले होते. पण या शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करीत ते सोमनाथ प्रकल्पावर राबत होते. या काळात अनेक थोर साहित्यिक, समाजकारणी, चित्रपटसृष्टीतील कलाकार श्रमसंस्कार शिबिराला येऊन हजेरी लावून गेले. त्याच दरम्यान बाबांचे ऑपरेशन लंडनला करायचे ठरले. बाबा यापूर्वी परदेशी गेले नव्हते. ते फक्त खादीचे कपडे वापरत. मग त्यांचे कपडे आणि सुटकेस यांची सोय श्री विश्राम बेडेकर व त्यांच्या पत्नी मालती बेडेकर यांनी केली. इंग्लंडमधील भारताचे राजदूत माननीय आप्पासाहेब पंत यांच्या घरीच बाबा व साधनाताई जवळपास एक महिना राहिले.
गडचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय बंग आणि त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग कार्य करतात. एकदा त्यांच्या आग्रहावरून साधनाताई बंग पती-पत्नींनी आयोजित केलेल्या ‘स्त्री जागृती’ शिबिरात गेल्या. तिथे बोलताना साधनाताई म्हणाल्या, “पती-पत्नीने एकमेकांना समजावून घेऊन, दोघांची सुखदुःखे एकच समजून, जर जीवनाची वाटचाल केली, तर आयुष्यात निराशा कधीच येणार नाही. शुद्ध प्रेमाकडे त्याग आणि समर्पण लोहचुंबकासारखे खेचले जातात.”
एकीकडे समाजकार्य चालू असताना विकास व प्रकाश मोठे होत होते. दोघांनीही नागपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि शहरात न राहता बाबांनी घेतलेला समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवला. हेमलकसा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर डॉ. विकास यांचे लग्न डॉ. भारतीशी झाले. भारती या औरंगाबादचे खासदार भाऊसाहेब वैशंपायन यांच्या कन्या होत्या. त्यावेळी विकास फक्त २५० रुपये मानधन घेत असे. एवढ्या पैशात संसार चालवणारी आणि कुष्ठरोग्यांच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य घालवू इच्छिणारी मुलगी डॉ. विकासला हवी होती. पुढे डॉ. भारतीने आनंदवनमधला दवाखाना उत्तमरीत्या सांभाळला. कौस्तुभ व शीतल ही त्यांची दोन मुले. कौस्तुभ सीए झाला, तर शीतल डॉक्टर झाली.
डॉ. प्रकाश यांनी डॉ. मंदाकिनी यांच्याशी विवाह केला. मंदाताईंचे माहेरचे आडनाव देशपांडे. त्यांचे वडील नागपूरला शेतकी कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, तर आई डी.एड. कॉलेजमध्ये होत्या. आनंदवनामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचे लग्न झाले. दोघांनी हेमलकसा प्रकल्प उत्तमरीत्या सांभाळला. बाबा आणि साधनाताई यांची मानसकन्या रेणुका. तिने नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तीही प्रकाश व मंदाताई यांच्याबरोबर हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी प्रकल्पा’त काम करायला गेली. रेणुकेचे लग्न विलास मनोहर यांच्याशी झाले. विलास मनोहर पुण्याचे होते. ते वर्षभरासाठी हेमलकसा येथे आले आणि तेथेच कायम राहिले.
डॉ. प्रकाश यांना प्राण्यांचे प्रचंड वेड होते, म्हणून वन्य पशूंची शिकार करणारे आदिवासी लोक त्यांना प्राण्यांची लहान पिल्ले आणून देऊ लागले. त्यातूनच पुढे प्राण्यांचे अनाथालय तयार झाले. डॉ. प्रकाश यांच्या प्राणिमित्रांवर विलास मनोहर यांनी ‘नेगल’ नावाचे सुंदर पुस्तक लिहिले आहे.
साधनाताईंची दुसरी मानसकन्या बिजली. ती मूकबधिर शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करू लागली. तिचे लग्न प्रकाशभाई मोहाडीकरांचा भाचा विकास याच्याशी झाले. पुढे विकासने आनंदवनात येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा यांची दोन मुले दिगंत व अनिकेत. दिगंत डॉक्टर झाला आणि त्याने आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालविला. तर अनिकेत पुण्याहून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा घेऊन परत हेमलकसाला आला आणि लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रशासन हाती घेतले.
बाबांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला जेव्हा कन्याकुमारीपासून सुरुवात झाली, तेव्हा साधनाताई त्यांच्याबरोबर होत्या. मात्र त्यानंतर त्या यात्रेत सहभागी झाल्या नाहीत. साधनाताई त्यावेळी वरोड्याच्या एका संस्थेत ‘सहसचिव’ म्हणून कार्य करीत होत्या. त्यामुळे कागदपत्रांवर सह्या करणे व इतर काही कामे जातीने करणे आवश्यक होते. पुढे ही यात्रा जेव्हा पंजाबमध्ये शिरली तेव्हा त्या आणि डॉ. प्रकाश बाबांबरोबर होते. दुसरी भारत जोडो यात्रा जेव्हा झाली तेव्हाही साधनाताई बाबांच्या बरोबर नव्हत्या. १९८८ मध्ये साधनाताई हेमलकसा येथून परत येत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. बरेच दिवस त्यांचा पाय प्लास्टरमध्ये होता.
१९९० साली साधनाताई आणि बाबा कसरावद गावाजवळ नर्मदेच्या तीरी येऊन राहिले. यावेळी आनंदवन खऱ्या अर्थाने डॉ. विकास यांच्या हाती सोपवले गेले.
या सर्व काळात बाबांची प्रकृती अजिबात चांगली नव्हती. तरुणपणी केलेले कष्ट, शरीराची केलेली हेळसांड यामुळे शरीर साथ देत नव्हते. पण बाबांचे मन मात्र तरुणच होते. डॉ. प्रकाश व डॉ. मंदा अनेक अडचणींना तोंड देऊन हेमलकसा उत्तमपणे सांभाळत होते.
बाबांनी एक प्रकारे वानप्रस्थाश्रम स्वीकारला होता. त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत नर्मदा तीरी राहण्याचे ठरवले होते पण शेवटी साधनाताईंची मानसिक अवस्था पाहून त्यांनी आनंदवनला परत येण्याचा निर्णय घेतला. मात्र आनंदवन इथे आल्यावरही त्यांच्या जीवाला स्वस्थता नव्हती.
बाबांची प्राणज्योत मालवली
२ फेब्रुवारी २००८ या दिवशी बाबांनी आनंदवनात त्यांच्या कर्मभूमीत शेवटचा श्वास घेतला. मानवतेचा एक महान दीप मालवला. ते केवळ एक समाजसेवक नव्हते, तर करूणेचे मूर्तिमंत रूप व अखंड उत्साहाचा स्त्रोत होते. अनेक वर्षे कष्ट व आजार यांचा सामना केला, पण त्यांनी आपले कार्य कधीही प्रकृती अस्वास्थ्यापायी थांबवले नाही.
निसर्गाशी एकरूप होणे ही बाबांची शेवटची इच्छा होती. त्यांनी आपला देह जाळण्याऐवजी मातीला अर्पण करण्याची विनंती केली होती, कारण त्यांचा आत्मा निसर्गाशी एकरूप झाला होता. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे शरीर आनंदवनात पुरण्यात आले व त्यावर रोप लावण्यात आले.
बाबा गेले, पण त्यांच्या विचारांचा सूर्य आजही तेजाने तळपत आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी बाबांनी सुरू केलेली परंपरा पुढे नेली. सर्वजण आनंदवन, हेमलकसा व सोमनाथ येथे समाजकार्यात रममाण झाले.