बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
बाबा एक समाजसेवक होते. त्यांच्या आयुष्यावर चार व्यक्तींच्या विचारसरणीचा प्रभाव होता—महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी व येशू ख्रिस्त. १९४२ च्या आंदोलनामध्ये बाबांनी गांधीजींबरोबर सहभाग घेतला होता. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने ते भारावून गेले होते. विनोबा भावेंचा संबंध बाबांशी प्रत्यक्षपणे आला होता. आनंदवनाच्या उद्घाटनाला विनोबाजी आले होते. विनोबांनी ‘अध्यात्म व विज्ञान यांची जीवनात सांगड घालण्याचा’ उपदेश केला होता; तो बाबांना फार आवडला होता. विनोबांचे गीताई व गीता प्रवचने बाबा नेहमी वाचत असत. साने गुरुजींचा प्रत्यक्ष संबंध बाबांशी आला नव्हता. त्यांनी एकदाच साने गुरुजींना पाहिले होते. बाबा या कोणाचेही अनुयायी नव्हते, परंतु त्यांच्या विचारांनी व कार्याने ते प्रेरित झाले होते.
विनोबाजींचा आणि बाबांचा नेहमी संपर्क असे. अनेक अवघड प्रसंगांत विनोबांनी बाबांना धीर दिला होता, मार्गदर्शन केले होते, नैतिक पाठिंबा दिला होता. बाबांनीही त्यांचे म्हणणे ऐकले होते. बाबांनी ‘करुणेचा कलाम’ ही कविता विनोबाजींसाठी लिहिली आहे.
साने गुरुजींचा जन्मदिवस २४ डिसेंबर, म्हणून बाबांनी त्यांचे बरेचसे प्रकल्प व उपक्रम या दिवशी सुरू केले. बाबा म्हणत, “साने गुरुजी आणि माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती. मी त्यांना एकदाच दुरून पाहिले होते, पण त्यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकांनी त्यांचे खरे दर्शन मला झाले. मुलगा, आई व पत्नी कशी असावी, हे त्यांच्या कथांनी मला शिकवले.” बाबांना ‘श्रमिकांचे विद्यापीठ’ ही संकल्पना साने गुरुजींच्या साहित्यावरूनच मिळाली होती.
बाबांनी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांचे ‘ज्वाला आणि फुले’ (१९६४), ‘माती जागवली त्याला मत’, ‘करुणेचा कलाम’ (१९८४) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. काही लेख त्यांनी मुद्दाम लिहिले. वेगवेगळ्या अभियानांमध्ये ते तरुणांना व्याख्याने देत असत. या सर्वांमागे त्यांचे विचार, मनन आणि चिंतन असे. बाबांच्या साहित्यामध्ये त्यांचे विचार स्पष्टपणे दिसून येतात.
गद्य आणि पद्य लेखनातून बाबांनी अनेक विषय हाताळले आहेत. उदाहरणार्थ, धर्म, क्रांती, भांडवलशाही, कुटुंबनियोजन, निवृत्ती, दानधर्म इत्यादी.
बाबांच्या कवितांमध्ये अनेक पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आढळतात. पु. ल. देशपांडे यांनी बाबांच्या ‘करुणेचा कलाम’ या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. त्यात पु. ल. म्हणतात, ‘पण सत्याचे दर्शन ही तापदायक गोष्ट आहे. ‘करुणेचा कलाम’ काय किंवा ‘ज्वाला आणि फुले’ काय, त्यातील ओळी अप्रिय सत्याचा चटका केव्हा देऊन जातील, ते सांगता येत नाही. ही कविता वाचता-वाचता आपण स्वतःची परीक्षा केव्हा घ्यायला लागतो, ते लक्षातही येत नाही; म्हणून ती धोकेबाज आहे.’
बाबांच्या लेखनातून, काव्यातून, भाषणातून त्यांची विद्वत्ता प्रकट होते. ते स्वतः प्रत्येक विषयावर सखोल चिंतन करत आणि मगच व्यक्त होत. त्यांचे विचार ठाम आणि स्पष्ट असत. बाबा जे बोलत, ते सर्वांना पटत असे, कारण ते कोणत्याही धार्मिक दृष्टिकोनातून बोलत नसत. ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून विचार करीत. आनंदवनामध्ये एकही धर्मस्थळ नाही. प्रत्येक व्यक्तीला जो धर्म आचरायचा आहे, तो आचरायची मुभा आनंदवनामध्ये आहे. बाबांच्या मते विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते म्हणत, “अध्यात्म म्हणजे माणसाच्या अंतर्मनात सुव्यवस्थेसाठी चालू असलेला वैचारिक शोध. हाच शोध जेव्हा आपण बाहेरच्या दिशेला वळवतो, तेव्हा त्याला आपण विज्ञान म्हणतो.”
बाबांचे विचार विज्ञाननिष्ठ होते. ते नेहमी नव्याचे कौतुक करत. नवीन गोष्टी, नवीन प्रथा यांत जे योग्य असेल ते स्वीकारण्याचा त्यांचा कल असे. ‘नवीन म्हणजे सगळेच वाईट’ असे त्यांना वाटत नसे. म्हणूनच ‘ज्वाला आणि फुले’ या कवितासंग्रहातील ‘माझं कलियुग’ या कवितेत ते विचारतात, ‘अरे अशी कोणती पापे आहेत जी कलियुगाने केली आणि त्या युगात झाली नाहीत?’
नवीन पिढीला बाबांनी कधीही उपदेशाचे डोस पाजले नाहीत. शेवटच्या काळात बाबा वानप्रस्थ स्वीकारून आनंदवनात राहिले, पण ते सर्वांना प्रेम देत जगले. ‘ज्वाला आणि फुले’ या कवितासंग्रहातील एका कवितेत ते म्हणतात, ‘प्रेम देणाऱ्या या वानप्रस्थावर नव्या पिढ्याही प्रेम करतील आणि त्याच्या पदचिन्हांवरून वाटचाल करण्यास सहज तयार होतील, तेव्हा बाजीप्रभूसारखा तो तरुण पिढीला संदेश देईल, नवे किल्ले सर करण्यासाठी तुम्ही पुढे व्हा! तुमच्यासाठी ही एक खिंड मी लढवीन! किमान एक खिंड मी लढवीन!’
‘ज्वाला आणि फुले’ या कवितासंग्रहातील कविता म्हणजे बाबांनी त्यांच्या आयुष्यात भोगलेले सुख-दुःखाचे अनुभव. याशिवाय सामाजिक आणि राजकीय निरीक्षणही या कवितांमध्ये आपल्याला दिसून येते. बाबांच्या या कविता म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच आहे, असे म्हणता येईल.
बाबांच्या बऱ्याच कवितांमध्ये आपल्याला येशू दिसतो. येशू म्हणजे करुणा, प्रेम आणि बंधुभाव. यासाठी बाबांना येशू ख्रिस्त प्रिय होता.
बाबांना समाजातील दुर्लक्षित, वंचित लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे नेहमी वाटत असे आणि याच भावनेतून त्यांनी आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा असे भव्य-दिव्य प्रकल्प उभारले. याच भावनेमुळे त्यांच्या प्रत्येक व्याख्यानात, लेखात किंवा कवितेत आपल्याला करुणा दिसून येते. अपंग, मूकबधिर, आदिवासी लोक यांच्यासाठी बाबांचा जीव नेहमीच तळमळत असे आणि हीच तळमळ त्यांच्या लेखनातून प्रतीत होते.
बाबा उत्तम कथाकथनकार होते. त्यांच्या गोष्टींमध्ये करुणेबरोबर विनोद असे, नाट्य असे व तत्त्वज्ञान देखील असे. त्यांचे लिखाण सहज, सोप्या भाषेत लिहिलेले असे. त्यांचे लिहिणे व बोलणे श्रोत्याला विचार करायला भाग पाडते. श्रोता किंवा वाचक नकळत अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. स्वतःच्या मनाशी संवाद साधायला लागतो. बाबा जरी सतत विचार करीत असत, तरी त्यांची विनोदबुद्धी लोकांना आकर्षित करत असे.
बाबांचे साहित्य समाजप्रबोधनाचे कार्य करते. त्यांच्या लेखनात माणूस केंद्रस्थानी आहे. कुष्ठरोगी, गरीब, शोषित व उपेक्षित लोकांच्या वेदना त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या साहित्यातून त्यांचा जीवनप्रवास व त्यांचे ध्येय स्पष्टपणे समोर येते. बाबांचे लेखन तरुणांना प्रेरित करते, कृती करायला प्रवृत्त करते. त्याचबरोबर सेवाभावाची जाणीव, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणाही देते. बाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कित्येक तरुण सामाजिक कार्याकडे वळले, हेच त्यांच्या विचारांचे फलित आहे