बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
बाबांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. अशा व्यक्तीचा प्रेमविवाह व्हावा, तोदेखील त्यांच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या मुलीशी, हा निव्वळ दैवी योग म्हणायला हवा. ही मुलगी म्हणजे पूर्वाश्रमीची इंदू घुले आणि लग्नानंतरच्या साधनाताई आमटे. बाबांनी इंदूला प्रथम पाहिले मात्र; आणि त्यांची अवस्था विश्वामित्रासारखी झाली.
लग्नापूर्वी साधनाताई अत्यंत संकोची, भिडस्त आणि अबोल होत्या. त्यांना शाळा कॉलेजमध्ये सुद्धा फारशा मैत्रिणी नव्हत्या. त्यांचे वडील फार लवकर - म्हणजे त्या आठ वर्षांच्या असताना वारले. घराणे परंपरावादी, सनातनी, धार्मिक आणि जात-पात मानणारे. लहान इंदू लग्नाआधी सर्व व्रतवैकल्ये मन लावून करीत असे. घरकाम व स्वयंपाक यात निपुण. अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे वर्गात कायम पहिला नंबर असेच, पण व्यासपीठावर जाऊन बक्षीस घ्यायचे म्हणजे तिच्या छातीत धडधडायचे, इतकी ती बुजरी होती. याउलट बाबांचा स्वभाव, त्यांना बोलायला खूप आवडे. त्यांचा प्रचंड मोठा लोकसंग्रह. बाबा कलेचे भोक्ते तर इंदूकडे कलेचा अभाव. बाबा स्वप्न रंगवणारे तर ती वास्तवाला घट्ट धरून ठेवणारी. तरीही बाबांचा सुताचा ताणा व इंदूचा रेशमी बाणा यांचे त्यांच्या जीवनाच्या मागावर अत्यंत सुंदर गर्भरेशमी वस्त्र विणले गेले.
लग्न होण्यापूर्वी बाबांचा पेहराव म्हणजे भगव्या रंगाचा अंगरखा, खादीचे शुभ्र धोतर, खांद्यावर कांबळे, दाढी मिशा, वाढलेल्या केसांच्या जटा, पाठीवर एक मोठी कपडे भरलेली पिशवी आणि हातात एक काठी. सर्वजण त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाला घाबरत असत. इंदूच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने बाबांचे घुलेंच्या घरी जाणे झाले आणि साधनाताईंच्या शब्दांत सांगायचे तर, दोघांचीही अवस्था ‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला’ अशी झाली.’ पुढे बाबा घुलेंच्या घरी आठ दिवस राहिले. त्या काळात त्यांनी घरातल्या मंडळींकडून इंदूबद्दल जाणून घेतले. इंदू गृहकृत्यदक्ष तर होतीच, पण तिला गरिबांविषयी अत्यंत कणव होती, ती घरातल्या मोलकरणीला भांडी घासायला, कपडे धुवायला मदत करी. त्या काळात भंगी, महार, मांग जातीच्या स्त्रियांना नळावर कोणी पाणी भरून देत नसे. अशावेळी इंदू त्यांना गुपचूप मदत करीत असे. याशिवाय गायीला चारापाणी करणे इंदू आवडीने करत असे. या सर्वच स्वभावगुणांचा बाबांवर अनुकूल परिणाम झाला. इंदूने मात्र बाबांची काही माहिती काढली नव्हती. त्यांच्यातला प्रियकर त्यांना आवडला होता.
इंदूच्या बहिणीचे लग्न झाल्यावरही बाबा घुलेंच्या घरी येतच राहिले. ते इंदूला पत्र लिहीत असत. एका अविवाहित तरुणीला एखादा तरुण पत्र पाठवतो हे त्या काळच्या रितीला मानवणारे नव्हते, पण बाबा अशा गोष्टींची फिकीर करत नसत. ते वारंवार घुलेंच्या घरी येत, राहत. अखेर त्यांनी इंदूला मागणी घातलीच. इंदूने लगेच होकार दिल्यावर घरचे सर्वजण मात्र खट्टू झाले.
घरच्या लोकांना बाबा फारसे पसंत नव्हते. त्याला कारणेही तशीच होती. बाबांच्या वयाचा, रूपाचा, विचारांचा, जातीभेद न मानण्याचा सगळाच प्रश्न होता. पण तरीही इंदू आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि शेवटी दोघांचे लग्न लावून द्यायचे हे पक्के झाले.
लग्न ठरल्यानंतरच्या चार महिन्यांच्या काळात बाबा आणि इंदूला एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. एकमेकांबद्दलची ओढ आणि लोकापवादाची भीती अशा संमिश्र भावना अनुभवत, घरच्यांची नापसंती स्वीकारत पत्रांची ये-जा सुरूच होती. पत्रांतून कवी मनाच्या बाबांच्या रसिकतेला उधाण आले होते. बाबांचे घरी येणेही वाढले होते आणि त्यांच्या सहवासात इंदूचे कामातून लक्ष विचलित होणे हाही थट्टेचा विषय बनला होता. कुणा परिचितांशी बाबांची ओळख करून दिल्यावर येणाऱ्या त्यांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांची इंदू आणि तिच्या आईला एव्हाना सवय झाली होती. दुसरीकडे बाबांचे अनेक हितचिंतक मात्र इंदूला भेटून शुभेच्छा देऊन गेले.
लग्नाच्या आठेक दिवस आधी एक विलक्षण घटना घडली. बाबा घुले यांच्या घरी मुक्कामास असताना रात्री घरात चोर शिरले. बाबांनी त्यांना प्रतिकार केला. चोरांनी सुऱ्यांच्या सहाय्याने बाबांवर वार केले. बाबांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले.
१८ डिसेंबर १९४६ या दिवशी जखमांवर पट्ट्या, बँडेज लावलेल्या अवस्थेत बाबा बोहल्यावर चढले. बाबांनी लग्न जरी वैदिक पद्धतीने केले तरी ते या रीतीरिवाजांच्या विरुद्ध होते. नंतर मात्र संपूर्ण आयुष्यात बाबांनी विधी, पूजा अशा कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत. भिक्षुक लोकांना शुभ - अशुभप्रसंगी आपल्या जीवनात प्रवेश दिला नाही. साधनाताई मात्र अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या आणि म्हणून पुढे बाबा साधनाताईंच्या पूजेच्या किंवा व्रतवैकल्यांच्या आड आले नाहीत.
लग्न झाल्यावर काही दिवस बाबा व साधनाताई धरमपेठला राहून मग वरोड्याला गेले. सुरुवातीच्या दिवसांत घरातल्या मंडळींना आपलेसे करून घेणे दोघांनाही अवघड गेले. कारण त्या काळाचा विचार करता, रूढी परंपरांविरुद्ध वागण्यातून गैरसमज निर्माण होणे स्वाभाविक होते. अर्थात, अनेक वर्षांनंतर गैरसमजाचे सावट दूर झाले आणि वडिलांची सेवा करण्याचे समाधान बाबा आणि साधनाताईंना मिळाले.
वरोडयाला पोचल्यावर खऱ्या अर्थाने बाबा आणि साधनाताईचा संसार सुरू झाला. साधनाताई म्हणतात, “बाबांचे घर म्हणजे एका ब्रह्मचाऱ्याची कुटी होती. सर्वत्र पसारा होता. बाबांना सर्व कामांची सवय होती. त्यामुळे दोघांनी मिळून घरातली सर्व कामे करायचे असे ठरले.”
बाबा साधनाताईंना स्वयंपाकात, घरकामात मदत करत, ही गोष्ट त्या वेळच्या पद्धतीविरुद्ध होती. संध्याकाळी बाबा साधनाताईंना घेऊन फिरायला जात. लग्न होण्याच्या एक महिना आधी बाबांनी वकिली सोडून दिली होती. ते वरोडा म्युनिसिपालिटीचे उपाध्यक्ष होते, अनेक संस्थांचे मान्यवर पदाधिकारी होते. त्यामुळे दिवसभर अनेक लोक घरी सतत येत जात असत. शेवटी या सर्व व्यापांचा दोघांनाही कंटाळा आला आणि बाबांनी सर्व संस्थांचा राजीनामा दिला. बाबा एकाच वेळी पती व प्रियकर असत. त्यांना साधनाताई सतत त्यांच्याबरोबर असाव्या असे वाटत असे. हे एकत्र कुटुंबात शक्य नव्हते, त्यामुळे वरोड्याला आल्यावर हे स्वातंत्र्य मिळाले होते.
वरोड्याला आल्यावर बाबा व साधनाताई रोज रात्री हरिजन वस्तीत जात. त्यांना देशभक्तीपर गीते शिकवत, वस्तीची स्वच्छता करायला प्रवृत्त करत. बाबा त्या लोकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जागरुक करीत. त्यांना मुख्य धारेत आणण्यासाठी बाबांचे प्रयत्न सुरू होते.
याच काळात बाबांच्या निस्पृह वृत्तीचा साधनाताईंना अनुभव आला. एके दिवशी दोन व्यक्ती शिंगाड्याने भरलेले पोते ओसरीवर ठेवून गेल्या. संध्याकाळी बाबा परत आल्यावर त्यांचे लक्ष त्या पोत्याकडे गेले आणि त्यांचा पारा प्रचंड चढला. अशा भेटी देऊन कामे करण्याची सवय असलेल्यांची मात्र बाबांचा हा पवित्रा पाहून गाळण उडाली.
साधनाताईंचे आयुष्य आमूलाग्र बदलत होते. त्यांच्या माहेरी हरिजनाने स्पर्श केला तरी कपडे बदलावे लागत. रस्त्याने जाताना भंगी समोर आला तर विटाळ झाला म्हणून कपडे बदलावे लागत आणि आता त्या बाबांबरोबर हरिजन वस्तीत जात होत्या, त्या बायकांबरोबर उठत बसत होत्या, खात होत्या. बाबांच्या सर्व उपक्रमांत त्यांच्याबरोबर उभ्या होत्या. कितीही संकटे आली तरी न डगमगता त्यांना तोंड देण्याची, अपार कष्ट घेण्याची, निंदा ऐकण्याची त्यांनी तयारी ठेवली होती. लहानपणी ऐकलेल्या सीता-सावित्रीच्या कथांप्रमाणे पतिव्रता व्हायचा त्यांनी निश्चय केला होता.
नागपूरहून साधनाताई व बाबा वरोड्याला आले तेव्हा रस्त्यात साधनाताईंना बघायला अनेक लोक उभे होते. वरोड्यापासून त्यांचे खेडेगाव दूर होते. रस्त्यातील एका गावात लोकांनी जेवणाचा बेत आखला होता. ते सर्व कुणबी पाटील होते. साधनाताई म्हणतात, “याआधी मी कधीही इतर जातीच्या लोकांनी बनवलेले अन्न जेवले नव्हते. म्हणून त्या लोकांनी एका ब्राह्मणाला स्वयंपाक करायला बोलवायचे ठरवले. पण मी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले. बाबा जे करतात ते योग्यच आहे - असे समजून वागायचे मी मनापासून ठरविले होते. म्हणून मी त्यांना सांगितले की मी तुमच्याबरोबरच जेवणार आहे. माझ्या मनात चलबिचल चालू होती, परंतु पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यात कसलाही दोष नाही, ही मनाची पक्की समजूत झाली आणि ते आचरणात आणताना कसलेच प्रयास मला पडले नाहीत.”
रस्त्याने जाताना कुठेही पाणी दिसले, नदी दिसली की बाबा नदीत उतरत. जलविहार चाले आणि मग तीन दगडांची चूल मांडून साधनाताईंना पिठलं भाकरी करावी लागे. रस्त्यात असा स्वयंपाक करून जेवणे बाबांना फार आवडत असे. बाबांना व साधनाताईंना एकत्र आणण्याचे काम आजूबाजूच्या वनश्रीने केले, कारण दोघांनाही निसर्गाचे अतिशय प्रेम.
अशा पद्धतीने बाबा व साधनाताई यांचा संसार चालू होता. बाबांनी आपल्या वडिलोपार्जित मिळकतीवरील सर्व हक्क सोडून दिले होते. पण थोड्याच दिवसात त्यांच्या सहजीवनात कसोटीचा काळ येणार होता, तो म्हणजे बाबांचा ‘श्रमाश्रम प्रयोग.’ साधनाताई म्हणतात, “बाबांसमवेत आयुष्य काढणं हे काही गुलाबाच्या राशींवर लोळल्या इतकं साधं सोपं नव्हतं. बाबा त्यांच्या पिढीतल्या इतर पुरुषांपेक्षा वेगळे होते. त्यांचं म्हणणं असायचं की घरात नवरा बायको दोघांनी मिळून सर्व कामे करायची. त्यांना जे पटेल ते करताना ते लोकांच्या निंदेचा, जनरीतीचा विचार करीत नसत. आपल्याला जे योग्य वाटते ते करणे हा त्यांचा स्वभावधर्मच होता. कुणाकडे पाहुणे म्हणून राहायला गेल्यावरही आपला भार त्यांच्यावर पडू नये म्हणून त्यांच्या घरची कामे करताना बाबा मागेपुढे पाहत नसत.”
बाबा व साधनाताई ज्या घरात राहत तिथे ते दलित लोकांना शिकवत असत. ते मान्य नसल्यामुळे घरमालकाने त्यांना घर सोडून जायला सांगितले. त्याचवेळी त्यावेळचे अन्नमंत्री रा. कृ. पाटील यांनी त्यांचा रिकामा बंगला बाबांना राहायला दिला. त्यावेळी बाबा व साधनाताईंचा मोठा पुत्र विकास काही महिन्यांचा होता. इथेच बाबांनी त्यांचा साम्यवादाचा प्रयोग केला तो म्हणजे ‘श्रमाश्रम प्रयोग.’
कॉलेजच्या दिवसात बाबांच्या अंतरंगात झपाट्याने बदल होत होते. मार्क्स, रस्किन, सर्वोदय, अंत्योदय, श्रमप्रतिष्ठा अशा वेगवेगळ्या संकल्पना त्यांच्या मनात घर करून बसल्या होत्या. मार्क्सवादात श्रमाला मूलभूत स्थान आहे. श्रम हा सर्व संपत्तीचा स्त्रोत आहे. निसर्ग श्रमाला सामग्री पुरवतो म्हणून निसर्गाच्या खालोखाल श्रमाला महत्त्व आहे - असे मार्क्सवाद सांगतो. महात्मा गांधी व विनोबाजी म्हणत, ‘श्रमाने आत्मशुद्धी होते.’ या दोन्ही विचारांच्या प्रेरणेतून बाबांनी श्रमाश्रम हा एक लोकविलक्षण प्रयोग करायचे ठरविले.
रा. कृ. पाटील यांच्या गावाबाहेरील बंगल्यामध्ये सामुदायिक जीवन जगण्याचा वेगळा प्रयोग सुरू झाला. डॉ. विकास आमटे त्यांच्या ‘आनंदवन प्रयोगवन’ या पुस्तकात लिहितात - ‘श्रमाश्रम प्रयोगाची कल्पना बाबांची, पण या प्रयोगाचा कणा होती आमची आई - म्हणजेच ताई. बाबा व इतर पुरुष मंडळी घराबाहेर पडली की एवढ्या मोठ्या कुटुंबाचा डोलारा सांभाळण्याचं काम ताईने केलं.’
या बंगल्यामध्ये वेगवेगळी कामे करणारे लोक एकत्र येऊन राहिले. त्यात भंग्यांपासून वकिलांपर्यंत सर्व होते. काही श्रमजीवी तर काही बुद्धिजीवी. सर्वांनी आपली दिवसभराची कमाई एकत्र करायची. सर्वांनी एकत्र जेवायचे. एकत्र राहायचे. एकच प्रार्थना करायची. अस्पृश्यतेला तिथे स्थान नव्हते. बाबा स्वतः लाकडे तोडून आणत. भाजी विकायला बाजारात नेत. तर साधनाताई स्वयंपाक करणे, आजारी लोकांची सेवा शुश्रुषा करणे, कपडे धुणे, विहिरीवरून पाणी भरणे इत्यादी कामे करीत. पुरुष मंडळी बाहेर कामाला गेली की घरातली कामे बायकांनी सांभाळायची असे ठरले होते. अर्थात मुख्य जबाबदारी साधनाताईंचीच होती.
हा काळ आमटे उभयतांसाठी अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा होता. मात्र गरिबीचा वसा घेतलेला असल्याने मिळेल त्यात समाधान मानत त्यांनी आनंदात दिवस काढले. मोठा विकास आणि धाकटा प्रकाश देखील परिस्थितीशी जुळवून घेत मोठे होत होते.
साधारण वर्षभरानंतर साथीचे रोग आणि इतर काही कारणांमुळे श्रमाश्रमाचा प्रयोग बाबांना सोडावा लागला. पण या प्रयोगातून बाबांना नवीन दृष्टी मिळाली. पुढे त्यांनी आनंदवनासारखा प्रचंड मोठा प्रकल्प याच अनुभवाच्या बळावर उभा केला असे म्हणायला हरकत नाही.