बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
बाबांचे पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. आईचे नाव लक्ष्मीबाई. आठ भावंडांपैकी ते एक. आई-वडील त्यांना ‘बाबा’ अशी हाक मारत त्यामुळे तेच नाव पुढे रूढ झाले. मुरलीधर म्हणजे कृष्ण. कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले व त्याचा जीवनरथ पुढे नेला. त्याचप्रमाणे या मुरलीधराने आपले नाव सार्थ करीत, कुष्ठरोगी, अपंग, अंध, दुबळ्या, वंचित लोकांचे सारथ्य करून त्यांना प्रगतीपथावर आणले. बाबांचे घराणे ‘मालगुजारा’चे. वरोड्याजवळ त्यांची साडेचारशे एकर जमीन होती. घरची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. वडील ब्रिटिश सरकारच्या नोकरीत होते. त्यांनी नागपूरच्या श्रीमंत वस्तीमध्ये एक बंगला बांधला होता. बाबांचे राहणीमान या संपत्तीला शोभेल असेच होते. घरात दिमतीला नोकर होते. शाळेत सोडायला घोडागाडी जायची, तर कॉलेजमध्ये बाबा मोटारीने जात. बाबा त्यांच्या वडिलांना ‘बाबूजी’ म्हणत असत. त्यांचे वडील प्रतिष्ठेला जपणारे होते. त्यांना चाकोरीबद्ध परंपरेनुसार चालणारे आयुष्य आवडे, तर बाबांचा स्वभाव अगदी विरुद्ध. बाबांना चाकोरीबध्द आयुष्य अजिबात आवडत नसे. त्यांना नेहमी काहीतरी वेगळे करून दाखवावे असे वाटत असे, त्यामुळे बाबांचे आपल्या वडिलांशी कधी फारसे पटलेच नाही.
बाबांना लहानपणापासूनच अनेक प्रश्न पडत. आपण ब्राह्मण, ‘वरच्या जाती’चे, शाळेतल्या ‘खालच्या जाती’च्या मुलांबरोबर मिसळायचे नाही, त्यांच्याबरोबर जेवायचे नाही, असे का? शेतकरी आपली जमीन कसतात मग ते गरीब का? अशा प्रश्नांची उत्तरे आईवडिलांकडून मिळणे शक्य नव्हते. पण बाबांना मात्र या गोष्टी पटत नसत. तसे ते पहिल्यापासूनच बंडखोर वृत्तीचे होते.
लहानपणी बाबांना आईला घरकामात मदत करायला खूप आवडे. दळण, सडा घालणे, रांगोळ्या काढणे अशी कामे करायला त्यांना आवडत असे. मोठे झाल्यावर मात्र बाबा मारामारी करणे, कुस्ती खेळणे, मासेमारी करणे, गुंड लोकांबरोबर राहणे, शिकार करणे यात रमलेले असत. ते क्रांतिकारी होण्याच्या मार्गावर होते, मात्र वडिलांना या कोणत्याच गोष्टी पसंत नव्हत्या.
समाजातील विषमता, अन्याय व गरिबीची प्रखर जाणीव बाबांना बालपणीच झाली होती. सामाजिक प्रश्नांबद्दल ते फार लवकर जागृत झाले. वडिलांना आवडत नसतानाही ते सर्व जातींच्या मुलांबरोबर खेळत, त्यांच्या घरी जात, त्यांच्याबरोबर जेवत. आपल्याला जे पटते ते निर्भीडपणे करावे, हा त्यांचा स्वभावविशेष लहानपणापासूनच दिसत होता.
एकदा दिवाळीत फटाके आणायला पैसे घेऊन बाबा दुकानात गेले. तिथे एक आंधळा भीक मागताना बाबांना दिसला आणि मागचा पुढचा विचार न करता फटाक्यासाठी मिळालेले सर्व पैसे बाबांनी त्या भिकाऱ्याला देऊन टाकले. द्यायचे ते सर्व देऊन टाकायचे हा त्यांचा स्थायीभाव, जे काही करायचं ते सर्वस्व ओतून करायचे, हातचे काही राखायचे नाही, हा त्यांचा स्वभाव पुढील आयुष्यातही कायम दिसत आला.
बाबांचे प्राथमिक शिक्षण वर्धा येथे झाले. माध्यमिक शिक्षण नागपूरला झाले, याचे कारण त्यांच्या वडिलांनी सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर नागपूरला धरमपेठेत बंगला बांधला.
वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या हातात रवींद्रनाथ टागोर यांचे ‘गीतांजली’ पुस्तक पडले. हे पुस्तक वाचता यावे म्हणून बाबांनी बंगाली भाषा शिकून घेतली आणि नंतर रवींद्रनाथांना भेटण्यासाठी त्यांनी कोलकाता गाठले. तिथे रवींद्रनाथांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
शाळेत व कॉलेजमध्ये बाबांचे लक्ष अभ्यासाकडे फारसे नसायचे, पण इतर अनेक गोष्टी त्यांना आकर्षित करत असत. मॅट्रिक झाल्यावर त्यांना डॉ. होण्याची इच्छा होती. डॉक्टर होऊन गरिबांची सेवा करावी असे त्यांना वाटत होते, पण त्यांच्या वडिलांना वाटत असे की बाबांनी वकील होऊन वकिली करावी. याबाबतीत मात्र बाबांना वडिलांच्या इच्छेपुढे मान तुकवावी लागली आणि त्यांनी आर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९३४ साली ते बी.ए. झाले.
कॉलेजचे आयुष्य बाबांनी त्यांना हवे तसे घालवले. दिमतीला मोटार होती. उंची कपडे, खाणे - पिणे, मौज मस्ती. शिवाय खिशात पैसे असायचे. पण एवढे असून बाबा बिघडले नाहीत, तर त्यांच्या सामाजिक जाणिवा आणखीनच तीव्र झाल्या. या काळात त्यांनी अनेक छंद जोपासले. ते कधी कुस्तीच्या आखाड्यात जात, दंड-बैठका काढत, तर कधी लाल मातीत आपले शरीर रंगवून घेत. कुस्तीत मिळालेली पदके ते छातीला पिना टोचून अडकवत. याच काळात बाबांना शिकारीचा छंदही जडला. अगदी लहान वयातच त्यांच्या हातात बंदूक पडली होती. ते निधड्या छातीचे होते, एखाद्या ढाण्या वाघासमोर ते उभे राहायचे. मचाणावर उभे राहून, चार लोकांना बरोबर घेऊन, शिकार करायची, असल्या गोष्टी त्यांच्यासाठी नव्हत्याच. अर्थात शिकारीला जाण्यापूर्वी बाबा आधी अभ्यास करत. त्यांनी शिकारीवरची बरीच पुस्तके वाचली होती. सावजाला फसवून शिकार करणे त्यांना पटत नसे. निर्भयपणा त्यांच्या रक्तातच होता. शिकार केली की मांसाहार करणे, दारू पिणे या गोष्टी ओघाने आल्याच. एखादी गोष्ट करायची म्हणजे त्यात अंतिम टोक गाठायचे हा त्यांचा खाक्या. कुठलीही गोष्ट काठावर बसून करणे त्यांना कधी जमलेच नाही. जे करायचे ते मनसोक्तपणे. पण एक छंद पूर्णपणे जोपासून झाला की ते त्यात रमत नसत. कुठल्याही छंदात ते कधी अडकून पडले नाहीत. शिकार करणे, दारू पिणे यातला फोलपणा समजल्यावर ते त्यातून बाहेर पडले आणि मग आयुष्यात कधीही त्यांनी दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. असा हा लोकविलक्षण अवलिया माणूस.
उत्कटता हाही बाबांचा उपजत स्वभाव. शिकारीप्रमाणे ते चित्रपटातही रमले. कॉलेजजीवनात त्यांनी बहुतेक सर्व चित्रपट पाहिले. काही चित्रपट तर त्यांनी दोन-तीनदा पाहिले. मग त्यातून चित्रपटाचे परीक्षण सुरू झाले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. ‘द सिनेमा गोअर’ या चित्रपटविषयक नियतकालिकात ते चित्रपटांची समीक्षा लिहू लागले. त्यातून त्यांची अमेरिकन अभिनेत्रींशी पत्रमैत्री सुरू झाली. इंग्रजी चित्रपट पाहायला बाबांना खूप आवडत असे. ग्रेटा गार्बो व नॉर्मा शिअर सारख्या प्रसिद्ध हॉलिवूड गाजविलेल्या अभिनेत्रींशी त्यांची मैत्री झाली. पण हे चित्रपटाचे वेड थोडेच दिवस टिकले. संगीताची मैफिल ही बाबा कधी चुकवत नसत. रुळलेल्या, मळलेल्या वाटेवरून जाणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर - त्यावेळी ते एखाद्या मांजराप्रमाणे वागत. मांजर कसे प्रत्येक खिडकीतून, दारातून डोकावून पाहते - त्याचप्रमाणे बाबांनी निरनिराळे छंद करून पाहिले - पण ते थोड्याच काळापुरते.
बाबांसाठी कवी सुरेश भट यांची ही कविता समर्पक आहे -
रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा । गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ।।
अनेक छंदांत रमूनही बाबा त्यात अडकून पडले नाहीत. खरे तर प्रत्येक छंदात त्यांनी आकंठ डुबकी मारलेली होती. हातचे राखून काही करणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. जे करायचे ते सर्वस्व ओतून, मग तो छंद असो, नाहीतर पुढच्या आयुष्यातील सामाजिक कार्य.
अशा या उत्कट, निर्भय, मनस्वी अवलियाला त्या काळच्या क्रांतिकारी चळवळीबद्दल प्रेम वाटणे साहजिकच होते. बाबा जरी श्रीमंत घराण्यातून आले होते तरी ते समाजापासून अलिप्त नव्हते. ‘माझे सगळे ठीक चालले आहे ना, मग जाऊ देत, मला काय करायचे आहे?’ असा विचार त्यांच्या मनाला कधीही शिवला नाही. नागपूरला कॉलेजमध्ये शिकत असताना ते क्रांतिकारी राजगुरूंच्या संपर्कात आले आणि झपाट्याने क्रांतिकारक चळवळीत ओढले गेले. ओघाने गुप्तचर्चा, गुप्त संघटना, गुप्त संदेश या गोष्टी आल्याच. बाबा त्यात गुंतून गेले. क्रांतिकारकांची निर्भयी वृत्ती त्यांना आवडली, कारण ती त्यांच्या वृत्तीशी जुळणारी होती. मात्र काही काळात त्यांना या क्रांतिकारक विचारांमधला फोलपणा समजून आला आणि ते महात्मा गांधींच्या विचारांकडे आकर्षिले गेले.
खरे तर यावेळी बाबा द्विधा मन:स्थितीत होते. त्यांचा आत्मशोध चालू होता. ‘आपण आयुष्यात काय केले पाहिजे, आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय, आपण नेमके काय करावे?’ हे त्यांना समजत नव्हते, त्यामुळे ते अस्वस्थ होते. बहुतेक सर्वच तरुणांच्या मनात या वयामध्ये असे बेचैन करणारे विचार असतातच. बाबादेखील अशाच मानसिक आंदोलनातून जात होते.
१९३४ साली बी.ए. झाल्यावर बाबांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ‘सरकारी विधी महाविद्यालया’त प्रवेश घेतला आणि १९३६ साली त्यांना कायद्याची पदवी मिळाली. सुरुवातीला मध्य प्रांतातल्या ‘दुर्ग’ या गावी माजी आमदार व वकील श्री. विश्वनाथ तामस्कर यांच्याकडे त्यांनी वकिली केली. राष्ट्रीय आंदोलनात तामस्कर पकडले गेले तेव्हा त्यांचा व्यवसाय बाबांनी यशस्वीरीत्या सांभाळला. पण फौजदारी खटले त्यांना अजिबात आवडले नाहीत. गुन्हेगारांसाठी वकिली करून पैसे कमवावे हे त्यांना पटत नव्हते. एकंदरीत वकिली व्यवसायाचा त्यांना उबग आला होता. त्यांनी तसे आपल्या वडिलांना सांगितले. वडील म्हणाले, “तू फौजदारी खटले चालवू नकोस. फक्त दिवाणी खटले घे.” पण मुळातच बाबांना वकिली व्यवसाय आवडत नव्हता. त्यांना वाटत असे - ‘मी काळा कोट घालून, गुन्हेगारांना संरक्षण देऊन तासाला पन्नास रुपये कमवावे - आणि त्याचवेळी एखादा मजूर दिवसभर काम करूनही फक्त बारा आणे मिळवतो - ही विषमता मला पटत नाही. मजुरांपेक्षा वकील काय जास्त काम करतात किंवा ते समाजासाठी जास्त काय करतात म्हणून त्यांनी जास्त पैसे घ्यावेत?’ असा विचार करून ते शेवटी वरोड्यात आले. वकिली करावीशी वाटत नसूनही केवळ वडिलांची इच्छा म्हणून त्यांनी वकिली चालू ठेवली. मात्र यावेळी बाबांनी एक नवा प्रयोग केला. आपले दोन वकील मित्र वामनराव स्वान आणि बापूकाका ख्रिस्ती यांच्याबरोबर सहकारी तत्त्वावर त्यांनी वकिली करायला सुरुवात केली. ‘सहकारी तत्त्व’ याचा अर्थ तिघांचे एकच खाते बँकेत होते व त्यातून कोणीही, कधीही, कितीही पैसे काढू शकत होते.
वरोड्यात हे तिघे फक्त श्रमजीवी लोकांचे खटले चालवत असत. त्या कारणाने बाबा या लोकांच्या संपर्कात आले. ‘श्रमजीवी’ लोक म्हणजे विणकर, झाडूवाले, भंगी, शिंपी इत्यादी. या लोकांसाठी बाबांनी त्या काळात सोळा संघटना उभ्या केल्या. डोक्यावरून मैला वाहून नेणारे भंगी हे सर्वात खालच्या स्तरातले. त्यांची गणना अस्पृश्यांमध्ये होत असे. त्यांचे काम कळावे यासाठी बाबा पहाटे चार वाजता उठून त्यांच्याबरोबर मैला वाहून न्यायला जात असत. कुठलेही काम करायचे ते स्वतःला झोकून देऊन, हा स्वभाव असल्याने बाबा पहाटे चार ते आठ वाजेपर्यंत भंग्यांबरोबर काम करीत. यातूनच पुढे बाबांना दलित, अस्पृश्य, श्रमजीवी लोकांचे आयुष्य जवळून पाहायला मिळाले. त्या लोकांची सुखदुःखे अनुभवायला मिळाली.
बाबा ‘सशस्त्र क्रांती’ मध्ये सामील झाले होते. पण थोड्याच दिवसात त्यांना कळून चुकले की सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान ‘सामाजिक क्रांती’ घडवून आणू शकत नाही. याचवेळी ते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाले. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि विनोबा भावे यांनी बाबांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. बाबांच्या नुसत्या विचारांमध्ये परिवर्तन झाले असे नाही तर त्यांचा पोशाखही बदलला. ते खादीचे कपडे वापरू लागले. घरात चरखा आला.
बाबा वरोड्याला आले तेव्हा श्री रा. कृ. पाटील यांनी आपल्या कलेक्टर पदाचा राजीनामा दिला होता. ते व इतर गांधीवादी तरुण गावात नेतृत्व करीत होते. रा. कृ. पाटील यांनी वरोड्याला ‘सहकारी उपभोक्ता भांडार’ काढले. बाबा त्यात सहभागी झाले.
त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचे काळे ढग जगावर पसरू लागले. भारतावर प्रत्यक्ष आक्रमण झाले नव्हते. पण भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे युद्धात ओढला गेला होता. याचवेळी महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला. १९३६ मध्ये बाबा महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात राहण्यासाठी गेले. बाबांवरील सशस्त्र क्रांतिकारकांचा प्रभाव कमी होऊन गांधीजींच्या विचारांकडे कल वाढला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि काही काळ तुरुंगवासही भोगला.
युद्धकाळात एक अशी घटना घडली ज्यामुळे बाबांच्या व्यक्तिमत्त्वातला एक पैलू प्रकर्षाने निदर्शनास आला. एकदा बाबा रेल्वेगाडीने वरोड्याहून नागपूरला जात होते. त्यांच्या डब्यात एक नवपरिणित जोडपे होते. ब्रिटिश सैनिकांसाठी त्यावेळी प्रत्येक गाडीत एक डबा राखून ठेवलेला असे. त्याशिवाय ते कुठल्याही डब्यात चढत असत. गोरे सैनिक बाबांच्या डब्यात शिरले आणि त्यांनी त्या नवपरिणित वधूची छेड काढण्यास सुरुवात केली. ती बिचारी गप्पपणे ते सहन करीत होती. बाबांनी त्या गोऱ्या सैनिकांना थांबविण्याचा प्रयत्न केला, पण त्या सैनिकांनी त्यांना मारहाण केली आणि पुढच्या स्टेशनावर गाडी थांबल्यावर बाबांना फलाटावर ढकलून दिले. आता बाबांनी सत्याग्रहाचे अस्त्र बाहेर काढले आणि निक्षून सांगितले, “या सैनिकांचा प्रमुख कमांडर इथे येईपर्यंत गाडी सुरू होणार नाही.” शेवटी तो कमांडर आला. त्याने बाबांना ‘त्या सैनिकांवर योग्य ती कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन दिले, तेव्हाच गाडी पुढे गेली. गांधीजींना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ते म्हणाले, “बाबा तर खरा ‘अभय साधक’ आहे.”
पुढे बाबांनी वकिली सोडून स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग घेतला. क्रांतिकारकांना शस्त्रे पुरवली. त्यासाठी त्यांना २१ दिवसाची शिक्षा झाली आणि त्यांना चंद्रपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आले.